(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यावी? महापालिका प्रशासनापुढे पेच; विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याप्रकरणी महापालिका प्रशासन आपल्या विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यादृष्टीने महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
Dasara Melava 2022 : शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट, दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) कोणाला परवानगी द्यावी, असा पेच मुंबई महापालिका (BMC) प्रशासनासमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच आता दसरा मेळाव्याप्रकरणी महापालिका प्रशासन आपल्या विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यादृष्टीने महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
शिवतीर्थावर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. दोन्ही गट शिवतीर्थासाठी आग्रही आहेत. महापालिकेकडून दोन्ही गटांच्या अर्जाची छाननी सुरु आहे. परंतु नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
सदा सरवणकर यांची रात्री अचानक महापालिकेच्या जी नॉर्थ ऑफिसमध्ये हजेरी
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर काल (15 सप्टेंबर) रात्री अचानक महापालिका जी नॉर्थ ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे देखील कार्यालयात हजर झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या दसरा मेळाव्याच्या जागेच्या परवानगीवरुन वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून देखील परवानगी मागण्यात आली आहे. मेळाव्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळणे बाकी असताना अचानक काल रात्री सरवणकर आणि सहाय्यक आयुक्त सपकाळे कार्यालयात पोहोचल्याने अनेक चर्चा सध्या सुरु आहेत.
बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ?
दरम्यान शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून सुरु आहे. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरु केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. तर सोमवारी (12 सप्टेंबर) शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आता शिवसेनेने मागितलेल्या परवानगीमुळे शिवाजी पार्कनंतर बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या