(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ShivSena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लान B'? शिवतीर्थ न मिळाल्यास 'या' जागेचा पर्याय
ShivSena Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लान B'? शिवतीर्थ न मिळाल्यास बीकेसीतील मैदानाचा पर्याय
ShivSena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरू केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला (MMRDA) पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची (BKC Ground) मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे. बीकेसीमध्ये दसरा मेळावा (Dasara Melava 2022) आयोजित करता यावा याकरता परवानगीसाठी पत्र लिहण्यात आलं आहे.
एकीकडे शिंदे गट मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिंदे गटाची या मेळाव्यासंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. यांत जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे.
शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून सुरु आहे. सोमवारी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आता शिवसेनेनं मागितलेल्या परवानगीमुळं शिवाजी पार्कनंतर बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चढा-ओढ सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेकडून अर्जांची छाननी सुरु
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? उद्धव ठाकरेंचा की शिंदे गटाचा? या संदर्भात मुंबई महाालिका लवकरच निर्णय घेणार आहे. गणेशोत्सव संपल्याने मुंबई महापालिका आता दोन्ही बाजूच्या अर्जाची छाननी करणार आहे. या संदर्भातील अहवाल मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाईल आणि त्यानंतर आयुक्त निर्णय जाहीर करतील. दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटानं बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा पर्याय ठेवलाय. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी तशी माहिती दिली आहे.