(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्रींचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी जे. जे. रुग्णालयात; उद्या अंत्यसंस्कार होण्याची शक्यता
Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाच्या चौकशीचे आदेश. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, अतिवेगाने गाडी चालवल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा.
Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा समूहाचे (Tata Group) माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं काल (रविवारी) निधन झालं आहे. रस्ते अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad Highway) चारोटी येथे हा अपघात झाला. अतिवेगानं गाडी चालवली जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचं पार्थिव रात्री मुंबईत दाखल झालं आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल.
सायरस मिस्त्री यांचं पार्थिव आज मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर सायरस मेस्त्री यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सायरस मिस्त्री यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. सायरस मिस्त्री यांचे भाऊ आणि मुलं आज रात्री मुंबईत आल्यानंतर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सायरस मिस्त्री यांचं पोस्टमार्टम रात्री अडीच वाजता पार पडलं आहे. मृत्यूच नेमकं कारण थोड्याच वेळात समोर येण्याची शक्यता असल्याची 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांत महामार्गांवरील अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सायरस मिस्त्री यांचा मृत्यूही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करत सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, "पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे." तसेच, "प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.", त्यांनी सायरस मिस्त्रींना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
पाहा व्हिडीओ : सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा झाला?
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली."
रविवारी दुपारी सायरस मेस्त्रींचा भीषण अपघात
54 वर्षी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. काल (रविवारी) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
54 वर्षीय सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात त्यांची कार डिव्हायडरला आदळली, तेव्हा हा अपघात झाला. कारमध्ये 4 लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. महिला कार चालवत होती, सध्या ती जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :