(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय तंत्रज्ञान वापरून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती, कोविड रुग्णांसाठी महत्वाची बातमी
'मेक इन इंडिया'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका तरुणाने भारतीय तंत्रज्ञान वापरुन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती केली आहे.
मुंबई : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असून जवळपास सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. वर्तमान परिस्थितीत ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. म्हणूनच सध्या एक पर्याय म्हणून आक्सिजन कंसेंटेटरची (Oxygen Concentrator) मागणी वाढत आहे. ज्याचा उपयोग खास करुन (होम आयसोलेशन) घरात उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रूग्णालयातही होऊ शकतो. असाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून मुंबईच्या एका मराठी तरुणाने बनविला आहे. यात भारतीय साहित्य सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
अंकुर पुराणिक हा मुंबईत राहणारा मराठी तरुण व्यवसायाने तंत्रज्ञ आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि आपण परदेशातून ऑक्सिजन मागवीत आहोत. पण अंकुर ह्यांनी शुद्ध भारतीय साधन सामग्रीचा वापर करत आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची पूर्तता करण्याचा एक पर्याय म्हणून आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिव्हाईस तयार केला आहे. ज्यामुळे घरीच तेही 24 तास आक्सिजन निर्मिती होऊ शकते.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कसं काम करतं?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एक वैद्यकीय डिव्हाइस आहे, जे पर्यावरणामधील आसपासच्या हवेपासून ऑक्सिजन गोळा करतो. पर्यावरणीय हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो. दुसरा गॅस उर्वरित 1 टक्के आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही हवा आत घेतो, दोन चेम्बरमध्ये GEOLITE हा लिक्विड वापरला जातो, जो दोन किंवा तीन वर्षात बदलला जातो. जमा केलेली हवा प्रोसेस करून फिल्टर केली जाते. नायट्रोजन परत हवेत सोडला जातो आणि उरलेल्या ऑक्सिजन रुग्णांना किंवा ज्यांना गरज असते त्यांना पुरवतो.
कॉन्सन्ट्रेटर किती ऑक्सिजन देऊ शकतो?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भिन्न भिन्न क्षमतांचे असू शकतात. छोटे पोर्टेबल कॉन्सन्ट्रेटर एका मिनिटाला एक किंवा दोन लिटर ऑक्सिजन प्रदान करू शकतात, तर मोठ्या कॉन्सन्ट्रेटरमध्ये प्रति मिनिट 5 किंवा 10 लिटर ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता असते. यातून मिळणारा ऑक्सिजन हा 90 ते 95 टक्के शुद्ध असतो. कॉन्सन्ट्रेटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा नियमित करण्यासाठी प्रेशर वाल्व बसविले जातात. वर्ष 2015 मध्ये डब्ल्यूएचओने (WHO) जाहिर केलेल्या अहवालानुसार, कॉन्सन्ट्रेटर हे सतत काम करू शकतात आणि ज्यामुळे दीर्घ काळापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा सतत होऊ शकतो.
कोरोना रूग्णांसाठी किती प्रभावी आहे?
तज्ञांचे मत आहे की कोविडचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी हे आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खूप उपयुक्त आहे. परंतु, अत्यंत गंभीर स्थितीत ज्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे जास्त प्रभावी नाही. पण जोपर्यंत गंभीर रुग्णांना सिलेंडरद्वारे पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत अशा रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी ह्या आक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर केला शकतो.
येणाऱ्या दिवसांमध्ये हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अतिशय स्वस्त दरात लोकांना उपलब्ध होईल आणि त्याला पुन्हा रिफील करण्याचीही गरजही नसेल. त्यामुळे सध्या ऑक्सिजनसाठी लोकांची होणारी वणवण या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे कुठेतरी थांबेल हीच अपेक्षा बाळगू.