बिल्डरकडून आठ कोटींची खंडणी उकळणारे बंटी-बबली अखेर पोलिसांच्या जाळ्यात
डोंबिवलीतील बिल्डरकडून आठ कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडत दाम्पत्याला अटक केली. त्यांच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.
डोंबिवली : बिल्डरकडून आठ कोटींची खंडणी उकळणारे बंटी-बबली अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. डोंबिवली पोलिसांनी मंगळवारी (29 डिसेंबर) दीड तासाच्या प्रयत्नानंतर घराचा दरवाजा तोडत महिलेसह तिच्या पतीला अटक केली.
एका दाम्पत्याने दोन साथीदारांसह डोंबिवलीतील एका विकासकाकडून तब्बल आठ कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. डोंबिवली जवळील नांदिवली परिसरातील इमारत बेकायदेशीर असल्याबाबत तक्रार करण्याची धमकी त्यांनी दिली होती. यानंतर मानपाडा पोलिसात दाम्पत्यासह दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास व्हावा म्हणून हे प्रकरण विष्णूनगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. परंतु महिनाभर उलटूनही हे चौघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर काल या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विद्या म्हात्रे आणि विश्वनाथ म्हात्रे हे दोघे घरी असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकत या दोघांना अटक केली.
महत्त्वाचं म्हणजे घराला कुलूप लावून हे दाम्पत्य घरात लपून बसलं होतं. घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी घराला टाळा बघितला. मात्र संशय आल्याने त्यांनी टाळा तोडत घरात प्रवेश केला आणि या बंटी-बबलीला अटक केली. या नंतर या महिलेने आरडाओरड करत एकच गोंधळ घातला. दरम्यान या प्रकरणातील त्यांचे दोन फरार साथीदार सुनील म्हात्रे, एकनाथ म्हात्रे यांचा शोध पोलीस घेत आहेत