Coronavirus | मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरु
प्लाझ्मा थेरपीच्या प्रक्रियेसाठी लागणारं प्लाझ्मा फेरेसिस मशिन नायर रुग्णालयात लावण्यात आलं आहे. याठिकाणी कोविड-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांना बोलवून प्लाझ्माचे विलगीकरण करण्याची प्रक्रीया केली जाईल.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी सुरु केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोविड-19 आजारातून बरे झालेल्या 3 रुग्णांकडून प्लाझ्माचे 3 युनिट कोरोनाच्या उपचारासाठी मिळवले आहेत. वैद्यकीय सल्ल्यानंतर कोविड -19 रुग्णांना हे उपचार देण्यात येईल. या रुग्णांचे ब्लड ग्रुप तपासणी करुन जुळवण्यात येत आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
प्लाझ्मा थेरपीच्या प्रक्रियेसाठी लागणारं प्लाझ्मा फेरेसिस मशिन नायर रुग्णालयात लावण्यात आलं आहे. याठिकाणी कोविड-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांना बोलवून प्लाझ्माचे विलगीकरण करण्याची प्रक्रीया केली जाईल. आणखी 5 रुग्णांना संपर्क करुन त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांचे प्लाझ्मा घेण्याची तयारी सुरु आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
तसेच आणखी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांशी संपर्क सुरु आहे. या थेरपीचा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होईल, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
- यात अँटीबॉडीचा वापर केला जातो. त्यामुळे याला प्लाझ्मा थेरपी तसंच अँटीबॉडी थेरपी म्हटलं जातं
- ज्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असते आणि त्यातून तो पूर्ण बरा होतो अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात
- अँटीबॉडीच्या भरवशावरच रुग्ण बरा होतो
BLOG | प्लाझ्मा थेरपीची बाराखडी
प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?
- विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात
- बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसऱ्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात
- अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो
- अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते
काय आहे पूर्ण प्रक्रिया?
- जे रुग्ण बरे होतात त्यांच्या शरीरातून अस्पेरेसिस तंत्रज्ञानाच्या आधारे रक्त घेतलं जातं.
- डॉक्टरांच्या माहितीनुसार अँटीबॉडी रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असतात.
- दात्याच्या शरीरातून 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतला जातो.. ज्याचा उपयोग 3 ते 4 रुग्णांमध्ये होतो
- या प्लाझ्माच्या माध्यमातून कोविडच्या रुग्णांमध्ये ट्रान्सफ्यूजन केलं जातं
- ज्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज पोहोचवल्या जातात
- अँटीबॉडीज अक्टिव होऊ लागल्यानंतर विषाणू कमजोर होऊ लागतो
प्लाझ्मा डोनर कोण असू शकतं?
- कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला रुग्ण
- कोरोनातून बरा झाल्यानंतर 14 दिवस कुठलीही लक्षणं न दिसून आलेला रुग्ण
- थ्रोट आणि नेजल स्वॅब तीनवेळा निगेटिव्ह आल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करु शकतो