(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गरज पडल्यास नर्सिंगचं काम करण्यास तयार, मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या गणवेशात रुग्णालयात
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या माजी परिचारिका आहेत. आज परिचारिकेच्या गणवेशात नायर रुग्णालयात जाऊन त्यांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला.
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज नायर रुग्णालयात हजेरी लावून तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. परंतु किशोरी पेडणेकर यांना पाहून कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. कारण किशोरी पेडणेकर परिचारिकेच्य गणवेशात रुग्णालयात हजर झाल्या. परिचारिकेच्या गणवेशात रुग्णालयात जाऊन महापौरांनी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला. विशेष म्हणजे किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 19 वर्षानंतर परिचारिकेचा गणवेश परिधान केला.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या माजी परिचारिका आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी अनेक वर्ष नर्सिंग क्षेत्रात परिचारिका म्हणून रुग्णांची शुश्रुषा करण्याचं काम केलं आहे. त्यांना नर्सिंग क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. त्यात आज त्यांनी रुग्णालयात गणवेशात जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचं मनोधैर्य वाढवलं.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर माजी परिचारिका आहेत... आज त्यांनी मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला...आज नायर रुग्णालयात परिचारीकेच्या वेषात जाऊन त्यांनी तेथे काम करणा-या कर्मचा-यांचा हुरुप वाढवला..@abpmajhatv pic.twitter.com/03JdrB9OSy
— Manashree Pathak (@Manshreepathak) April 27, 2020
नर्सिंगच्या विद्यार्थिनींना महापौरांचं मार्गदर्शन वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेल्या माजी डॉक्टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लढाईविरुद्ध लढण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यानुसार किशोरी पेडणेकरही गेल्या अनेक दिवसांपासून नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना मला नर्सिंगची ड्युटी करु द्या अशी विनंती करत होत्या. अखेर आज त्यांनी परिचारिकेचा गणवेश परिधान करुन नायर रुग्णालयात हजेरी लावली. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी त्यांना नर्सिंगच्या मुलींसाठी लेक्चर घेण्याची विनंती केली. त्यांनीही तात्काळ होकार देऊन 100 पेक्षा जास्त नर्सिंगच्या विद्यार्थिनींना या कोरोनाच्या या काळात काम करत असताना स्वतःची काळजी कशी घ्यावी, यावर लेक्चर दिले. शिवाय त्यांचं मनोबल कसं उंचावेल यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन दिले.
गरज पडल्यास नर्सिंगचं काम करण्यास तयार : किशोरी पेडणेकर "मी अनेक वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम केलं आहे. आज मी नर्सिंगच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आवाहन केलं आहे, त्याला प्रतिसाद देत आम्ही हे काम करत आहोत. सध्या मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयातील नर्सिंगच्या मुलींच्या भेटी घेणार आहे. गरज पडल्यास नर्सिंगचे कामही करण्यास मी तयार आहे," अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
*AnythingForMumbai* We cant do work from home, we are on the field for you, stay at your home, take care....#covid19 At Nair Hospital@mybmc @AUThackeray pic.twitter.com/LEWnPPw5oW
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) April 27, 2020