(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown : छुप्या सुरू असलेल्या सलूनमध्ये चार बेशुद्ध, बोईसर येथील घटना
बोईसर येथील ओस्तवाल भागात असलेल्या अल्युर सलून आणि स्पा सेंटर शुक्रवारी छुप्या पद्धतीने सुरू केल्याचे उघड झाले. या ठिकाणी सलूनचे शटर बंद करून आतमध्ये जनरेटर सुरू करून सलून चालवले जात होते.
पालघर : कोरोनाच्या निर्बंधामुळे शासनाने कागदोपत्री जरी सलून दुकाने बंद ठेवली तरी बोईसर मध्ये शटर खाली करून छुप्या पद्धतीने सलून सुरू असल्याचे उघड झाले आहे. बोईसर ओस्तवाल येथील एक सलून छुप्या पध्दतीने शटर खाली करून सलून सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी ओस्तवाल भागात विद्युतपुरवठा खंडित असल्याने सलून मालकानी जनरेटर हे शटर बंद खोलीतच सुरू ठेवल्याने श्वास गुदमरून सलून मालकासह कर्मचारी व ग्राहक असे चार लोक बेशुद्ध पडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
बोईसर येथील ओस्तवाल भागात असलेल्या अल्युर सलून आणि स्पा सेंटर शुक्रवारी छुप्या पद्धतीने सुरू केल्याचे उघड झाले. या ठिकाणी सलूनचे शटर बंद करून आतमध्ये जनरेटर सुरू करून सलून चालवले जात होते. ओस्तवाल भागातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने सलून मालकांनी शटरच्या मध्ये बंद खोलीतच जनरेटर सुरू केले. यावेळी एक महिला ग्राहक देखील या ठिकाणी उपस्थित होती. या ठिकाणी छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या सलूनच्या बाहेर एक इसम कोणी येते का हे बघण्यासाठी ठेवला गेला होता. जनरेटरमधून निघणाऱ्या कार्बनडायऑक्साईडमुळे श्वास गुदमरून गेल्याने सर्व बेशुद्ध झाले होते. सलून मध्ये बेशुद्ध पडलेल्या सलून मालक धनश्री संखे(35), युसुब शेख (25), योगिता वेलवणकर(23) आणि प्रभा (38) अशा तीन महिला आणि एका पुरूषांवर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सलूनमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत बोईसर पोलिसांना विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. संचारबंदी असताना सलून सुरू ठेवल्याने अशा प्रकारे नियम धुडकावून काम करणाऱ्या सलूनवर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकरणी स्थानिक पोलिसांचा बोलण्यास नकार दिला आहे.