Coronavirus | डॉक्टरांना मोठं यश, मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह
याआधी महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. आता मुंबईतील 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.
याआधी महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. पुण्यातील दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आल्याचं कालच (23 मार्च) स्पष्ट झालं होतं. आता मुंबईतील 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हे सगळे जण पुढील काही दिवस निरीक्षणाखालीच राहणार आहेत.
Coronavirus | महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार, रुग्णांची संख्या 101 वर
पुण्यातील दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह पुण्यातील पहिल्या दोन पॉझिटीव रुग्णांची चौदा दिवसानंतर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करुन घरी सोडण्यात येईल. नऊ मार्चला हे दोघे पती पत्नी पॉझिटीव्ह ठरले होते. महाराष्ट्रात समोर आलेले कोरोना पॉझिटीव्ह ठरलेले हे पहिले रुग्ण होते. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सोबतच ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले होते. त्या कॅबचा चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे सामोरे आले होते. दरम्यान, आता या दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर, मुलगी आणि कॅब चालकावर अद्याप उपचार सुरु आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. बातमी लिहित असताना हा आकडा 101 पर्यंत पोहोचला आहे. यात मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक 38 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत. देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 500 पार झाला आहे. तर 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई शहर आणि उपनगर - 38 पिंपरी चिंचवड मनपा - 12 पुणे मनपा - 19 नागपूर - 4 यवतमाळ - 4 नवी मुंबई - 5 कल्याण - 4 सांगली - 4 अहमदनगर - 2 रायगड - 1 ठाणे - 2 पनवेल- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी – 1 वसई-विरार - 1 सातारा - 2