Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख
क्वॉरन्टाईन केलेले रुग्ण पळून जाण्याचं वृत्त वारंवार ऐकायला मिळत आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी क्वॉरन्टाईन केलं असतानाही तिथून पळ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांनी यासंदर्भात ट्वीट करुन अशा लोकांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी होऊ नये, यासाठी लागण झालेल्यांना क्वॉरन्टाईन केलं जात आहे. असं असूनही हातावर क्वॉरन्टाईनचा शिक्का असलेले काही जण सार्वजनिक वाहनातून तसंच शहरांमध्ये फिरताना आढळले होते. यामुळे इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्र्यांनी अशा लोकांवर साथीचे रोग अधिनियमअन्वये कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला 'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे.#WarOnCorona
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2020
पालघरमध्ये चौघांना उतरवलं परदेशातून आलेले गुजरातमधील चार जण काल (१८ मार्च) गरीबरथ या ट्रेनमधून प्रवास करत होते. सहप्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्का पाहिल्यानंतर टीसीला याबाबत सूचना दिली. त्यानंतर त्यांना पालघर रेल्वे स्थानकात उतरवण्यात आलं.
Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास
सौराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये सहा जण तर आजही सहा प्रवाशांना बोरिवली इथे उतरवण्यात आलं. हे सहा जण आज सकाळी सौराष्ट्र मेलमधून मुंबई सेंट्रलवरुन वडोदरा इथे जात होते. या सहा जणांच्या हातावर क्वॉरन्टाईन केल्याचे स्टॅम्प होते. हे सगळे जण सिंगापूरहून आले होते. अखेर त्यांना बोरिवलीला उतरवण्यात आलं.
महाराष्ट्रात 49 जण कोरोनाबाधित महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली असून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 12 तासात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.