(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Vaccines Delivered | लस आली रे! कोरोनाविरोधातील 'ब्रह्मास्त्र' कोविशिल्ड लस मुंबईत दाखल
Mumbai Corona Vaccines Delivered : सीरमच्या कोविशिल्ड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Mumbai Corona Vaccines Delivered : सीरमची कोविशिल्ड लस मुंबईत दाखल झाली आहे. पहाटे साडेपाच वाजता लसीचा पहिला साठा मुंबईत पोहोचला आहे. मुंबईला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून 1 लाख 39 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या अधिक होती. तसेच सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असणाऱ्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रासह देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील धारावीतही कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधित होता. सध्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 365 दिवस इतका आहे.
कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज (दिनांक १३ जानेवारी २०२१) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली #MyBMCUpdates #COVIDVaccination #Covidshield pic.twitter.com/U2WCjUXkqR
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 13, 2021
कोविशिल्ड लसीचा पहिला साठा आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईत दाखल झाला. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. मुंबईत एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा साठा घेऊन येणाऱ्या वाहनाचं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं.
मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात लस ठेवण्यात आली आहे. दोन वॉक इन कुलर्स, रेफ्रिजरेटर यामध्ये लस ठेवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचं सर्वात कार्यक्षम कोल्ड स्टोरेज असलेल्या परळ विभागाची क्षमता एकावेळी 10 लाख लस साठवण्याची आहे. साधरणत: इथे पोलिओच्या लसी ठेवल्या जातात. मुंबईला पहिल्या टप्यात 1 लाख 39 हजार 500 लस मिळाल्या असून येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
कशी आहे लसीकरणाची तयारी?
मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एकावेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे 10 लाख लसी साठवता येऊ शकतात. अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.
देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर अशा 2 लाख लोकांची नावे कोवीन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्डस्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र, लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी आहे.
5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग
मुंबई महानगरपालिकेने 275 मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे काकाणी यांनी सांगितले.
सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण
मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस
पालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी 9 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 72 बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक 5 बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान 100 जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे
महत्त्वाच्या बातम्या :