मुंबईत कोरोना लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पार, महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये 70 टक्के लसीकरण
लसीकरण करण्यात आलेल्या एकूण व्यक्तिंपैकी 47.36 टक्के संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 106 लसीकरण केंद्रे कार्यरत असून, यापैकी 28 महापालिकेच्या अखत्यारितील आहेत.
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारी पासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे ‘कोविड – 19’ या साथरोगावरील लसीकरण सुरु झाले. त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून पहिल्या फळीतील (Front Line) कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरणास सुरुवात झाली. तर 1 मार्च 2021 पासून सुरु झालेल्या तिसऱ्या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि वयाची 45 वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नेतृत्त्वात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत सुनियोजित प्रकारे लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा 10 लाखांचा टप्पा पार झाला असून, आजपर्यंत एकूण 10 लाख 8 हजार 323 इतके लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी, 7 लाख 7 हजार 474 इतके म्हणजेच 70.16 टक्के लसीकरण हे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आले आहे.
तसेच लसीकरणाबाबत एक उल्लेखनीय बाब म्हणजे लसीकरण करण्यात आलेल्या एकूण व्यक्तिंपैकी 47.36 टक्के संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 106 लसीकरण केंद्रे कार्यरत असून, यापैकी 28 महापालिकेच्या अखत्यारितील आहेत. या 28 लसीकरण केंद्रांवर एकूण 155 लसीकरण बूथ कार्यरत आहेत. तर राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारितील 12 लसीकरण केंद्रे कार्यरत असून तिथे एकूण 18 लसीकरण बूथ कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त विविध खासगी रुग्णालयांमध्ये 66 लसीकरण केंद्रे कार्यरत असून, त्याठिकाणी लसीकरणासाठी एकूण 74 बूथ आहेत. यानुसार सर्व 106 लसीकरण केंद्रांवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार नियमितपणे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासन यांच्या अखत्यारितील लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे. तर खासगी लसीकरण केंद्रांवर प्रती मात्रा रुपये 250 इतके शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Sachin Tendulkar Corona: सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती
सर्वाधिक लसीकरण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून आजवर 10 लाख 8 हजार 323 इतक्या लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 70.16 टक्के अर्थात 7 लाख 7 हजार 474 मात्रा या महानगरपालिकेच्या 28 लसीकरण केंद्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 29.84 टक्के लसीकरण हे राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारितील 12 लसीकरण केंद्रांद्वारे आणि 106 खासगी लसीकरण केंद्रांद्वारे करण्यात आले आहे.
टप्पेनिहाय लसीकरण व ज्येष्ठ नागरिकांची आघाडी
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे (Health Care Worker) लसीकरण सुरु करण्यात आले. या गटातील व्यक्तींना देण्यात आलेल्या लस मात्रांची संख्या ही आज 2 लाख 31 हजार 899 इतकी झाली आहे. यामध्ये लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची लसीकरण संख्या 80 हजार 155 (34.56 टक्के), तर पहिली मात्रा घेणाऱ्यांची लसीकरण संख्या 1 लाख 51 हजार 744 इतकी आहे.
यानंतर 1 फेब्रुवारी 2021 पासून पहिल्या फळीतील (Front Line Workers) कर्मचा-यांचे लसीकरण सुरु करण्यात असून या अंतर्गत आतापर्यंत 2 लाख 20 हजार 295 इतके लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची लसीकरण संख्या 56 हजार 770 तर पहिली मात्रा घेणाऱ्यांची लसीकरण संख्या 1 लाख 63 हजार 525 (74.23 टक्के) इतकी आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि वयाची 45 वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांचे लसीकरण करण्यात येत आहे. संपूर्ण लसीकरण प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक असून आजवर 4 लाख 77 हजार 507 एवढ्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण लसीकरण मात्रांचा विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची टक्केवारी ही 47.36 टक्के इतकी आहे. तर 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व सहव्याधी असणाऱ्या 78 हजार 622 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सीन’ अशा दोन्ही प्रकारच्या लशी उपलब्धतेनुसार देण्यात येत आहेत. या अंतर्गत आजवर कोव्हिशिल्डच्या 9 लाख 32 हजार 291 इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तर कोव्हॅक्सीन लशीच्या 76 हजार 27 इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यानुसार एकूण 10 लाख 8 हजार 323 इतक्या मात्रा आजवर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आल्या आहेत.