दादा, काही काळजी करु नका, तुम्ही बरं व्हाल; लेकीच्या या वाक्याने आधार दिला : धनंजय मुंडे
राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर त्यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना काळातले अनुभव शेअर केले.
मुंबई : "माझी प्रकृती व्यवस्थित असून जनतेच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पुण्याईने मला नवं जीवन मिळालं आहे," अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर ते आज एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना काळातले अनुभव शेअर केले. "माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, याचा आनंद वाटला," असंही ते यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांना उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केलं होतं. कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन ते आता घरी परतले आहेत. सध्या ते होम क्वॉरन्टाईन आहेत.
"माझी प्रकृती आता व्यवस्थित आहे. नियमाप्रमाणे होम क्वॉरन्टाईन आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे जीवन पुन्हा मिळालं. आता मी माझं आयुष्य जनतेच्या सेवेत घालवणार आहे," असं धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं.
आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडला धनंजय मुंडे म्हणाले की, "आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जेव्हा कळलं, तेव्हा आईचा चेहरा पहिल्यांदा समोर आला. आई सुरुवातीला पॅनिक झाली होती. परंतु तिच्यासह घरच्यांची समजूत काढली. मला कोरोना झाल्यानंतर पहिली काळजी हीच होती की कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसेल ना? यावेळी मुलींनीहीं समजूतदारपण दाखवला. "दादा, काही काळजी करु नका, तुम्ही बरं व्हाल", धाकट्या लेकीच्या या वाक्याने निश्चितच आधार दिला."
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण
बहिणीच्या फोनमुळे आनंद वाटला धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची बहिण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फोन करुन विचारपूस केली होती. याविषयी त्यांनी सांगितलं की, "आमच्यात संघर्ष झाला, कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. पण माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने चार-पाच वेळा फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला," असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
शरद पवार प्रेरणास्रोत, त्यांना डोळ्यासमोर ठेवून आजाराला सामोरं गेलो "शरद पवार आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाभयंकर आजाराला सामोरं जात होतं, मात करण्याचा प्रयत्न करत होतो. आपले नेतेही सुद्धा महाभयंकर आजाराशी लढले आहेत. ते आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे आपल्यालाही आजाराशी दोन हात करुन मात करायची आहे. आजारपणाच्या काळात तोच एक आधार दिसत होता.
धनंजय मुंडे यांच्यासोबत केलेल्या बातचीतमधले मुद्दे.....
- काम करणं हा बालपणापासूनचा स्वभाव आहे. होम क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर सामाजिक विभागाची कामं करायची आहेत : धनंजय मुंडे
- मानसिकदृष्ट्या खचू नका, गरज असेल तरच बाहेर पडा, स्वच्छता ठेवा : धनंजय मुंडे
- आमच्यात संघर्ष झाला, कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला : धनंजय मुंडे
- मला कोरोना झाल्यानंतर पहिली काळजी हीच होती की कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसेल ना? मुली समजूतदार आहेत. त्यांनी समजून घेतलं : धनजंय मुंडे
- आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जेव्हा कळलं, तेव्हा आईचा चेहरा पहिल्यांदा समोर आला : धनंजय मुंडे
- माझी प्रकृती आता व्यवस्थित आहे. नियमाप्रमाणे होम क्वॉरन्टाईन आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे जीवन पुन्हा मिळालं. आता मी माझं आयुष्य जनतेच्या सेवेत घालवणार आहे : धनंजय मुंडे
Dhananjay Munde | आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडतो : धनंजय मुंडे