(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update | मुंबईला जमलं ते ठाण्याला का नाही जमत? ही आहेत कारणे...
ठाणे जिल्ह्यात 36 हजार 219 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत 23 हजार 704 अॅक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात 36810 ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.
मुंबई : मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये नेहमी तुलना केली जाते. तशीच ती ठाणे आणि मुंबईमध्ये देखील केली जाते. आता पुन्हा एकदा ही तुलना करण्याची वेळ आलेली आहे. कारण मुंबई आणि ठाणे जिल्हा एकमेकांना चिटकून असलेले जिल्हे असले तरी दोन्ही जिल्ह्यातील रुग्णासंख्येत मात्र मोठा फरक दिसत आहे. एकीकडे मुंबई कोरोना मुक्तीकडे वाटचाल करते आहे. तर ठाण्यात अजूनही रुग्ण संख्या आटोक्यात आलेली नाही.
ठाण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही मुंबईपेक्षा जास्त असल्याचे राज्य सरकारने दिलेली आकडेवारी सांगते. ठाणे जिल्हा हा सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 36810 ॲक्टिव्ह रूग्ण असलेला पुणे जिल्हा सध्या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असून ठाणे जिल्ह्यात 36 हजार 219 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत 23 हजार 704 अॅक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात कोरोना कधी आटोक्यात येणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका बाजूला मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या कमी होत आहे, पण ठाणे जिल्ह्यात तीच रुग्णसंख्या वाढत जाते आहे. याची कारणे काय आहेत ती पाहुयात...
1- ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा महानगरपालिका आहेत. ज्यामध्ये अतिशय दाटीवाटीने राहणारे लोकसंख्या आहे. झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्यास मदत झाली. 2- मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, मुंबई पोलीस, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसेच अत्यावश्यक सेवेतील इतर कामगार हे मुंबईलगतच्या या सहा महानगरपालिकेत राहतात. ज्यांचे रोजचे प्रवास सुरू होते आणि आताच्या परिस्थितीत या रुग्णांची संख्या जास्त आहे. 3- या महानगरपालिकांमध्ये एकत्रित निर्णय घेतले गेले नाहीत. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव दिसून आला. प्रत्येक महानगरपालिका आपल्या क्षेत्रानुसार निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत होती. त्यामुळे समन्वय नसल्याने एकत्रितपणे प्रयत्न झाले नाहीत. 4- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जरी सुरुवातीपासून एकच असले तरी महानगरपालिकांमध्ये अधिकाऱ्यांच्या मोठ्याप्रमाणात बदली केल्या गेल्या. महानगरपालिकांचे आयुक्त तडकाफडकी बदलले गेले. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त देखील बदलण्यात आले. त्यामुळे निर्णय घेण्यात उशीर आणि गोंधळ झाला. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या क्षमतेनुसार निर्णय घेतले त्यामुळे रुग्णसंख्या वाढली. 5- मे महिन्यापर्यंत ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होती. मात्र त्यानंतर तीच रुग्णसंख्या जून महिन्यात प्रचंड वाढली. कारण सरकारने मिशन बिगीन अगेन सुरू केल्यानंतर नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे तारतम्य न बाळगता घराबाहेर येणे पसंत केले. रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची वर्दळ आणि लोकांची गर्दी दिसून आली. याचा परिणाम म्हणजे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. 6- ठाणे जिल्ह्यातून मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या सरकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असली तरी वाहतुकीची अतिशय मर्यादित साधने उपलब्ध आहेत. जून महिन्यात लोकल सुरू करण्यात आली मात्र त्याआधी खाजगी किंवा सरकारी बसमधून तसेच मिळेल त्या वाहनाने ऑफिस गाठायचा प्रयत्न लोकांनी केला. लोकल सुरू झाल्यानंतर देखील एसटी आणि बसमध्ये होणारी गर्दी अजून कमी झालेली नाही. 7- मुंबई सतत चर्चेमध्ये असल्यामुळे ठाणे जिल्ह्याकडे राज्यकर्त्यांचे देखील दुर्लक्ष झाले. मुंबईतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. मात्र तसे प्रयत्न ठाणे जिल्ह्यात झालेले आढळून आले नाहीत. कोविड केअर सेंटर अजूनही हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्यास उशीर केला गेला. तसेच विलगीकरण कक्ष देखील अतिशय दुय्यम दर्जाचे होते. 8- ठाणे जिल्ह्यात विविध महानगरपालिका तर्फे आता कोविड 19 रूग्णांसाठी हॉस्पिटल निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ज्या कामासाठी आधीच उशीर झाला आहे. मात्र असे असूनही या हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याची टीका महानगरपालिका तर्फे केली जात आहे. 9- ठाणे जिल्ह्यात राज्य सरकारचे दोन मंत्री वास्तव्यास आहेत. एक म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. तर दुसरे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असे असूनही ठाणे जिल्ह्यात पुरेशी आरोग्य यंत्रणा आणि मदत दिली गेली नाही. 10- मुंबईकडे लक्ष देणाऱ्या राज्य सरकारचे देखील ठाणे जिल्ह्यातील खालावलेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले. मुंबईमध्ये प्रत्येक हॉस्पिटलसाठी एक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमला गेला. प्रचंड निधी उपलब्ध केला गेला. त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात मात्र त्या प्रमाणात कार्यक्षम अधिकारी दिले गेले नाहीत.
या मुद्याप्रमाणे आणखी एक मोठा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेची आर्थिक सक्षमता. हजारो कोटींचे फिक्स डिपॉझिट असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला पैसे खर्च करण्यास अडचण आली नाही. मात्र ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. यामुळे देखील निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास उशीर झाला.
मुंबई सध्या पूर्वपदावर यायचा प्रयत्न करते आहे. अंदाजे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत कोविड 19 ला आळा घालण्यासाठी एकात्मिक प्रयत्न केले गेले. तो अभाव अंदाजे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यात आढळून आला. राज्य सरकारचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांच्या बदल्या, जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनात नसलेला समन्वय, ढासळलेली आरोग्य यंत्रणा अशा अनेक त्रुटीमुळे ठाणे जिल्ह्या सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.