Congress Agitation : ईडीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुंबईत काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात, भाजपविरोधी घोषणाबाजी
मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात येत आहे. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
Congress Agitation : ईडीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात येत आहे. हँगिंग गार्डन ते राजभवन अशा काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा काढण्यात येत आहे. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते देखील मोर्चात सहभागी झाले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले आहेत.
भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारावाईच्या विरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. राहुल गांधींना भाजपकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केलं जात असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील उपस्थित आहेत. दरम्यान, पोलिसांनी ठिकठिकाणी बँरिकेट्स लावली आहेत.
राहुल गांधींची 30 तास चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली. आता पुन्हा एकदा ईडीने (ED) शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशातील कॉंग्रेस पक्ष त्याविरोधात प्रचंड संतापला असून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा सत्याग्रह दडपण्यासाठी दिल्ली पोलिस केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यांची विधाने ए 4 आकाराच्या कागदावर टाईप केली जात आहेत. तसेच त्यावर मिनिट-मिनिटावर स्वाक्षरी केली जात आहे आणि नंतर तपास अधिकाऱ्यांकडे सोपवली जातात. पीटीआय या वृत्तसंस्थेने तपास एजन्सीच्या सूत्रांचा हवाला देत सांगितले की, राहुल गांधी यांची एजेएलच्या मालकीच्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत आणि ‘यंग इंडियन’ ही ना-नफा कंपनी भाडेतत्त्वावर घेण्याच्या व्यावसायिक हालचाली कशा करत होती याबद्दल चौकशी केली जात आहे. त्याची जमीन आणि इमारती. या प्रकरणी एफआयआर नसल्याचा काँग्रेसचा दावा आहे. तसेच हा ‘अनुसूचित अपराध’नाही, ज्याच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याचा (पीएमएलए) गुन्हा नोंदवला जावा आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात यावे.