ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या तिन्ही पक्षांवर प्रतिआरोप केले आहेत. असा आरोप करणे ही हास्यास्पद गोष्ट आहे. महासभेत बोलण्यात भाजप नगरसेवकांमध्ये नेहमी स्पर्धा असते. मी कोणालाही म्यूट करत नाही.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या नगरसेवकांचे आवाज बंद करुन सोयीचे ठराव पारित केले जात आहेत, असा आरोप सत्ताधारी शिवसेनेवर होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाण्यात शिवसेना व राष्टवादीचे मंत्रीमहोदय असताना देखील स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्टवादीमध्ये दुरावा निर्मण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर हा वाद ठाणे महापालिका पुरताच मर्यादित आहे की हा वाद आता दोन मंत्र्यांमध्ये सुरु आहे, अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे.
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या नगरसेवकांचे आवाज म्यूट करुन सोयीचे ठराव पारित केले जात आहेत. ऑनलाईन महासभेच्या नावाखाली ठाणे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांनी आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन हे गैरप्रकार थांबवण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याची तक्रार अनेकवेळा नगरसेवकांकडून केली जात आहे. तसेच होणारी चर्चा आणि ठराव यांच्यात नियमितपणे तफावत आढळत असते. हे प्रकार रोखण्यात यावे अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी आयुक्तांकडे केली आहे.
तर दुसरीकडे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या तिन्ही पक्षांवर प्रतिआरोप केले आहेत. असा आरोप करणे ही हास्यास्पद गोष्ट आहे. महासभेत बोलण्यात भाजप नगरसेवकांमध्ये नेहमी स्पर्धा असते. मी कोणालाही म्यूट करत नाही. पिठासीन अधिकारी मी आहे, तर ही तक्रार माझ्याकडे करायला हवी होती. सभागृहात कोणाला बोलू देणे अथवा न बोलू देण हा माझा अधिकार आहे. आयुक्त त्याला काय करतील. त्यांच्यात हिम्मत होती तर त्यांनी मला विचारायला हवं होत. महापौराविरोधात बोलने ही त्यांची जुनी सवय आहे, असं महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
राज्यात सत्तेत एकत्र येऊन कारभार करत असलेल्या तीन पक्षात ठाण्यात मात्र फूट पडली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सोबत घेऊन राजकारण करत आहे. मात्र हे नुसते राजकारण आहे की यामागे ठाण्यातील दोन बड्या नेत्यांमधील वाद आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.