'आता माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, त्यामुळं काही कमी पडणार नाही'; माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या घोषणा
आता माझ्यासोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे काही कमी पडणार नाही माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देणार असून सिडको घरांसाठी मदत करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
CM Eknath Shinde In Navi Mumbai Mathadi Melava: आता माझ्यासोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे काही कमी पडणार नाही माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देणार असून सिडको घरांसाठी मदत करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माथाडी कामगारांना काहीच कमी पडणार नाही. आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत. रोजगार, कारखाने याबद्दल आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय हे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. दोन-अडीच महिन्याचे सरकार आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षाचे सरकार यामध्ये फरक आहे, असंही ते म्हणाले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही मराठा समाजाला न्याय देवू. सारथीला मदत करू. सरकार तुमच्या पाठिशी आहे. दीड हजार लोकांच्या सरकारी नोकऱ्यांचा निर्णय घेतला. गेली अडीच वर्ष फाईल हालत नव्हती. आमचे सरकार देणारे, घेणारे नाही, असं ते म्हणाले.
आमचा कोणताही पर्सनल अजेंडा नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, समृध्दी महामार्गसारखा ऐतिहासिक मार्ग गेम चेंजर प्रकल्प आहे. मेट्रोची कामे फास्ट गतीने होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आमचा कोणताही पर्सनल अजेंडा नाही. सर्वांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. माथाडी कामगार संघटनांचे प्रश्न आम्ही सोडवणार. कामगार चळवळीत चुकीच्या प्रवृत्तीचा चोख बंदोबस्त केला जाईल. नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांना संरक्षण आम्ही दिले आहे, असं ते म्हणाले. कायदे बदलण्याची गरज आली तर तेही बदलू. पण सर्वसामान्यांना न्याय देवू, असंही ते म्हणाले. सरकार जबाबदारी पासून कधीच पळ काढणार नाही. आम्ही सामोरे जाणारे आहोत. वरळीमधील 10 हजार लोकं बाधीत होणार होते. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन निर्णय घेतला, त्यांना भाडे देण्याचा निर्णय घेतला. हे चालता बोलता काम करणारे सरकार आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकार आपल्या मागे खंबीरपणे उभं
मेट्रोचे काम थांबवले, पण आम्ही चालना दिली, रखडलेल्या प्रकल्पांना गती देतो आहोत. वॉर रूम मध्ये प्रकल्प घेतलेत. केंद्र सरकार आपल्या मागे खंबीरपणे उभं आहे. कुठेही निधी कमी पडून न देण्याचा पंतप्रधान यांनी शब्द दिला आहे. काही लोकं सांगतात, ही कंपनी गेली, ती कंपनी गेली. मात्र आम्ही उद्योग आणले. मागील अडीच वर्षात अनेक कंपन्या का गेल्या याची चौकशी करावी, असं ते म्हणाले. मला राजकीय भाष्य करायचे नाही. पण जनतेने शिवसेना - भाजपाला बहुमत दिले असताना तुम्ही तिकडे जाता. आम्ही चुकभूल दुरूस्त करून भाजपा बरोबर आलो, असं ते म्हणाले.