एक्स्प्लोर
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!
एकीकडे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरु असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोनवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण शुभेच्छांशिवाय त्यांच्यात काय राजकीय चर्चा झाली असेल यावरून अनेक तर्क-वितर्क सध्या सुरु आहेत.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज (गुरुवार) त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोनवरून दिल्या शुभेच्छा दिल्या. बिहारमधील राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे शुभेच्छांशिवाय सत्तेतल्या दोन प्रमुखांमध्ये काय राजकीय चर्चा झाली यावरून अनेक तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना बिहारमध्ये नितीश कुमार भाजपच्या साथीनं पुन्हा नव्यानं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळेच बिहारच्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रातही जाणवणार का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातही सत्तेतील भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीपासून प्रत्येक निर्णयावर शिवसेनेनं उठवलेली झोड, मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या समृद्धी महामार्गसारख्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, मोदी चोर है च्या घोषणा, आदींमुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार शाबूत आहे, पण काही अडचण आलीच, तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यास तयार असल्याचं सूचित केलं होतं. तर त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या संजय राऊत यांनी अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात, असं म्हटलं होतं. तिकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत तरी शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचं चित्र तरी दाखवतील. पण भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागले आहे. त्यामुळे बिहारमध्ये जी नवीन समीकरणं तयार होतील, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काही समीकरण होतील का, भाजप आणि सेनेचे संबंध अजून बिघडतील की पक्ष वाचवण्यासाठी युतीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील या चर्चेला विधान भवनात उधाण आलं आहे. 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, तर राज्यात पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्टनंतर राज्यात काही घडामोडी होतील का याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून आहे. संबंधित बातम्या: राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























