अंबरनाथच्या डम्पिंगविरोधात नागरिक एकवटले, नागरिकांचा अंबरनाथ पालिका प्रशासनाला इशारा
अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी 15 दिवसात हे डम्पिंग बंद होऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे बंद करायचं असेल, तर आणखी एक ते दीड वर्ष सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी यांनी केलं आहे.

कल्याण : अंबरनाथच्या मोरिवली पाड्याजवळ असलेल्या डम्पिंग ग्राऊंडविरोधात नागरिक एकवटले आहेत. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात मोरिवली पाड्याजवळील मोकळ्या खासगी जागेत गेल्या 70 वर्षांपासून अंबरनाथ पालिकेचा कचरा अनधिकृतपणे टाकला जातो. पूर्वी या भागात फारशी लोकवस्ती नसल्यानं डम्पिंगबाबत फारशा तक्रारी नव्हत्या. मात्र मागच्या 10 वर्षात या परिसरात नव्याने अनेक गृहप्रकल्प उभे राहिले असून त्यात राहायला आलेल्या नागरिकांना डम्पिंग ग्राऊंडमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय.
या डम्पिंगला दररोज आगी लावल्या जात असून त्याचा धूर पूर्णपणे लोकवस्तीत घुसतो. यामुळे या भागात अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. तर दुर्गंधी आणि माशा, डास याचाही त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे या डंपिंगविरोधात आता नागरिक एकवटले असून त्यांनी याबाबत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 15 दिवसात हे डम्पिंग ग्राऊंड बंद करून अन्यत्र स्थलांतरित झालं नाही, तर त्यापुढे डम्पिंगवर कचऱ्याचा एकही ट्रक रिकामा होऊ देणार नाही, असा थेट इशारा या नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी 15 दिवसात हे डम्पिंग बंद होऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी मिळून सामायिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून त्याची प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरु आहे. त्याला आधी एमएमआरडीए आणि नंतर राज्य सरकारची अंतिम मंजुरी मिळल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून त्याला आणखी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे बंद करायचं असेल, तर आणखी एक ते दीड वर्ष सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
