Mumbai: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Mumbai: छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला (Coastal Road) छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेनंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजबांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा आज गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात केली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 14, 2023
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्यांदाच या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती असल्याने या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे आणि त्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना मुंबईतील कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड' नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करणे प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहोचवला जाईल, याची शाश्वतीही त्यांनी दिली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे, राज्यातील गड, किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा:
Maharashtra Politics: मविआच्या बैठकीत ठरलं! लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार, जागा वाटपाचे काय?