Dombivli Blue Water : हिरवा पाऊस, गुलाबी रस्त्यानंतर डोंबिवलीत आता निळा नाला!
याआधी प्रदुषणामुळे डोंबिवलीत रस्ते गुलाबी होणं आणि हिरवा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. आता एमआयडीसी परिसरातील हा नाला चक्क निळ्या रंगाच्या पाण्याने वाहत आहे,
डोंबिवली : हिरवा पाऊस, गुलाबी रस्ता, हिरवा नाला यानंतर आता निळा नाला... हे वर्णन आहे डोंबिवलीचं. डोंबिवली एमआयडीसी परिसर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच सोमवारी (28 मार्च) दुपारच्या सुमारास एमआयडीसी फेज 2 गणेश नगर आशापुरा मंदिर परिसरातील एका मोठ्या नाल्यातून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागल्याने खळबळ उडाली. निळ्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटलेली होती. या नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांचे डोळे चुरचुरणे, मळमळणे यांसारखे त्रास सुरु झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील काही कंपन्यामधून थेट नाल्यात सोडल्या जाणाऱ्या घातक केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कायमच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. डोंबिवलीकर यापूर्वी हिरवा पाऊस, गुलाबी रस्ता, हिरवा नाला यामुळे त्रस्त होते. आता निळ्या रंगाच्या नाल्यामुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.
डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता, उद्योगमंत्र्यांनी पर्यावरण मंत्र्यांवर जबाबदारी ढकलली!
आजूबाजूच्या कंपन्यामधून प्रक्रिया केलेलं सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात आल्याने हा त्रास झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रदूषणावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रदूषण मंडळाचे पथक तातडीने घटनास्थळी धाडण्यात आलं. यासंदर्भात पाहणी करुन संबंधितावर तातडीने कारवाई केली जाईल, असं आश्वासन मंडळातर्फे देण्यात आलं.
दरम्यान याआधी प्रदुषणामुळे डोंबिवलीत रस्ते गुलाबी होणं आणि हिरवा पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. आता एमआयडीसी परिसरातील हा नाला चक्क निळ्या रंगाच्या पाण्याने वाहत आहे, हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या केमिकलचं पाणी नाल्यात सोडलं जात असल्याने कंपन्यांना नेमकं कोणाचं अभय आहे? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे डोंबिवलीच्या प्रदूषणाबाबत आजवर अनेकदा एबीपी माझानेही आवाज उठवला आहे. मात्र निगरगट्ट अधिकाऱ्यांमुळे हे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. त्यामुळे आता तरी डोंबिवलीच्या प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई होते का? की अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ सरकारवर येते, हे पाहावं लागणार आहे.
Dombivli Green Water : डोंबिवलीतील नाल्यात हिरव्या पाण्यानंतर आता निळं पाणी ABP Majha