(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Acharya Marathe College : चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड, जीन्स आणि टी शर्टला बंदी
Dress code in Acharya Marathe College : पोशाखाला रंगाचे बंधन नाही, मात्र तो सभ्य पद्धतीचा असावा असं सांगत कॉलेजने आपल्या निर्णयाचं समर्थन केलंय.
Dress code in Mumbai College : हल्ली कुठेही गेलं की जीन्स आणि टी-शर्ट घातलेले अनेकजण दिसतात. त्यातल्या त्यात कॉलेजचे विद्यार्थी म्हटलं की त्यांच्या अंगात जीन्स आणि टी-शर्ट दिसणार म्हणजे दिसणारच. मात्र याच जीन्स आणि टी-शर्टवर मुंबईतील एका कॉलेजने बंदी घातली आहे. मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजने विद्यार्थ्यांच्या जीन्स आणि टी-शर्टवर आक्षेप घेतला असून त्यावर बंदीही आणली आहे. मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजने जीन्स आणि टी-शर्ट घालून कॉलेजमध्ये येण्यास मज्जाव केला आहे.
काय आहे आचार्य मराठे कॉलेजचा आदेश?
विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन ते बदलावे आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल.
याबाबत पत्रकारांनी आचार्य मराठे कॉलेजच्या प्राचार्या विद्यागौरी लेले यांना याबाबत विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या की, प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना ड्रेसकोडबाबत समजावून सांगत आहोत. पोशाखाला रंगाचे बंधन नाही, मात्र तो सभ्य पद्धतीचा असावा. काही पालकांनी फोन करून या नियमावलीला समर्थन दिलंय.
खरंतर या कॉलेजने काही दिवसांआधी हिबाजवरही बंदी घातली होती. आता या कॉलेजने विद्यार्थ्यांवर जीन्स-टी शर्टवर बंदी घातल्याने राजकीय वर्तुळातही विरोधाचा सूर उमटलाय.
खरंतर विद्यार्थ्यांनी शिस्तीने वागावं, इतरांना लज्जा निर्माण होईल असे कपडे घालू नयेत हे कुणालाही मान्य असेलच. मात्र हल्लीच्या जमान्यात जीन्स आणि टीशर्ट हा परवलीचा पोशाख बनून गेलाय. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यामागे आचार्य मराठे कॉलेजचा काय हेतू आहे हे त्यांचं त्यांना ठावूक.
तरीही नियम करताना कुणाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर पाय पडत नाही ना? याची काळजी कॉलेजने घ्यायला हवी की नको?
ही बातमी वाचा: