... तर एकनाथ खडसे 2014 ला मुख्यमंत्री झाले असते : रावसाहेब दानवे
एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले की, खडसेंची नाराजी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासूनच सुरु झाली.
मुंबई : राजकारणात नाराजी एकदाच उद्भवत नसते. छोट्या मोठ्या घटनांनी ती वर येते. एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले की, खडसेंची नाराजी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यापासूनच सुरु झाली. मात्र त्यांना त्या काळात मुख्यमंत्री करता आलं नाही. त्यांना मुख्यमंत्री करता आलं नाही यात चूक कुणाची होती? नाथाभाऊंना प्रदेशाध्यक्ष व्हा असं म्हटलं होतं. राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांनी देखील त्यांना गळ घातलेली की प्रदेशाध्यक्ष व्हा. पण त्यांनी माझी तब्येत चांगली नाही असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद नाकारलं. त्यांना काय माहीत की 2014 ला आमचं सरकार येणार आहे. जर ते प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं ते दानवे म्हणाले.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
मंत्री दानवे म्हणाले की, मी स्वत: मुक्ताईनगरला त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा. मात्र त्यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही प्रदेशाध्यक्षपद नाकारलं. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायचे. जर त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असतं तर ते मुख्यमंत्री देखील झाले असते, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राजकारणात संधी येत असते. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं. मात्र त्यानंतरही राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती दिली. मात्र तरीही ते समाधानी नव्हते. त्यांची पात्रता होती ती खाती सांभाळण्याची याबाबत दुमत नाही, असंही दानवे म्हणाले.
... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
दानवे म्हणाले की, याआधी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर किती आरोप केले. आता एकमेकांवर आरोप करणारे एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीने खडसेंचा वापर विकासकामांसाठी करुन घ्यावा, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, आपल्या नाराजीसाठी खडसे यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. अमित शाहांसह अनेकांच्या भेटी त्यांनी घेतल्या. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नाही. आम्ही त्यांची मनधरणी करुन थकलो, मात्र ती दूर झाली नाही, असं देखील दानवे म्हणाले. नाथाभाऊंच्या जाण्यानं भाजपची हानी आहे. त्यांची मनधरणी करण्यात अपयशी ठरलो, असं देखील दानवे म्हणाले.
भाजपमध्ये एकही नेता असंतुष्ट नाही. यांच्यातच मेळ नाही, हे कुणाच्याही अपेक्षा पूर्ण करु शकत नाहीत, अशी टीका दानवेंनी केली.
दिल्या घरी सुखी राहावे - रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे यांनी प्रवेशाच्या घोषणा केलेल्या दिवशी म्हटलं होतं की, एकनाथ खडसेंचा हा दुर्देवी निर्णय आहे. त्यांचं राजकीय करिअर भाजपमध्ये घडलं. काही कारणांनी ते मुख्य प्रवाहातून बाहेर गेले. ते जिकडे जात आहेत, त्या लोकांनीही त्यांच्यावर टीका केल्या आहेत. काही काळ त्यांनी वाट पाहायला हवी होती. त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो. आम्ही चिंतन नेहमीच करतो. देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. आमच्यात मनभेद नव्हते, मतभेद होते. मतभेद सर्वच पक्षात असतात. राजकारणात अशा घटना घडत असतात. खडसे आणि फडणवीस हे चांगले मित्र होते. आमच्यात बिनसलं काही नव्हतं, असं दानवे म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी पक्षांतर करु नये. त्यांनी पक्षासाठी खूप केलं. पक्षानही त्यांना खूप दिलं, असंही दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- एकनाथ खडसेंकडून मोदींवर टीका करणारं रिट्वीट तासाभरातच डिलीट
- मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसेंकडून रिट्वीट
- राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'
- नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, समर्थक उदेसिंग पाडवी यांचा दावा
- उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...