(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रावादीत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व चर्चांवर एकनाथ खडसे यांना विचारलं असता, त्यांनी मात्र हा विषय आपल्याला माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. या विषयावर ज्यांनी ही चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा अस सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे हे आमचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे पक्षाला नुकसान पोहचेल.
राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याला पक्षात घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता तो नेता कोण यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
उत्तर महाराष्ट्रातील कोणता नेता 'घड्याळ' बांधणार?
उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आलं आहे.