(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतल्या इमारतींवर सीसीटीव्ही अनिवार्य करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकार कडक उपाययोजना करणार असून इमारतींवर सीसीटीव्ही अनिवार्य करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय.
मुंबई : मुंबईतील सुरक्षा वाढवण्यासाठी प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात नियम बदलणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. तसंच मुंबईत आणखी पाच हजार सीसीटीव्ही बसवणार असल्याचंही देशमुख म्हणाले. मुंबई देश आणि राज्यातील खूप संवेदनशील शहर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही पावलं उचलत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. तर, नेत्यांचे फोन टॅप झाल्याविषयी तक्रारी आल्या असून यात एकनाथ खडसे यांसारख्या भाजप नेत्यांचेही फोन टॅप झाल्याची माहिती मिळाल्याचे देखमुख म्हणाले.
देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रभावी करण्यासाठी प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमांत बदल करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. मुंबईमध्ये अजून 5 हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम नियमात बदल करण्यात येतील, असे संकेतही देशमुख यांनी दिलाय. यासाठी मुंबई महापालिकेला तशा सूचना देण्यात येणार आहेत.
फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल : एकनाथ खडसे
भाजप नेत्यांचेही फोन टॅप - गृहमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅपच्या तक्रारी आल्या आहेत. फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी गृहविभागाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तचर विभागाचे पोलिस सहआयुक्त अमितेश कुमार यांची दोन सदस्यीय समिती नेमली आहे. यात भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांचेही फोन टॅप होत असल्याची माहिती असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात दोनचार पत्र आल्याचेही त्यांनी सांगितले. याची चौकशी सुरू असल्याचंही देखमुख म्हणाले. फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे हे भाजपविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. त्याकाळात त्यांचाही फोन टॅप झाल्याची सुत्रांची माहिती आहे.
फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होते. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करुन त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
Mumbai Local | धक्कादायक! मुंबईकरांची लाईफलाईन ठरतेय डेथलाईन | ABP Majha