Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, तातडीच्या सुनावणीची वेळ ठरली
Badlapur Crime : बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाची दखल मुंबई हायकोर्टानं घेतली असून तातडीची सुनावणी होणार आहे.
मुंबई : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी उद्या सकाळी तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीकडून करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी होणार आहे.
बदलापूर प्रकरणात उद्या सुनावणी
मुंबई हायकोर्टानं बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाची दखल घेतली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या प्रकरणात उद्या सकाळी तातडीची सुनावणी होणार आहे.बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचं प्रकरण घडलं होतं. या प्रकरणाची तक्रार दाखल करुन घेण्यास 12 तासांचा कालावधी लागल्यानंतर बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. त्यातून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलक जवळपास 12 तास बदलापूर स्थानकात होते. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत 1 ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे याला लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कल्याणच्या कोर्टात त्याला हजर करण्यात आलं. न्यायालयानं अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, राज्य शासनानं या प्रकरणात एसआयीटीची स्थापना केली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बदलापूरमध्ये काल ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं त्यांना पोलिसांनी अटक केली असून काही आंदोलकांचा शोध सुरु आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं.
संबंधित बातम्या :