एक्स्प्लोर
कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि याच खटल्यातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती.

मुंबई : साल 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दोषमुक्तीसाठी दाखल केलेली याचिका प्रलंबित असल्याने सत्र न्यायालयातील सुनावणीस स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र बुधवारी एनआयए कोर्टात होणाऱ्या आरोपनिश्चिती प्रक्रियेस स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. तसंच संबंधित आरोपींवर यूएपीएअंतर्गत आरोप लावायचे की नाहीत याचा निर्णय एनआयए कोर्टानेच घ्यावा, असे आदेश देत हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि याच खटल्यातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधून आरोपमुक्त करण्यासाठी साध्वी प्रज्ञा आणि समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेतली नसल्याने, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असं म्हणत यातून आरोपमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका कर्नल प्रसाद पुरोहित यांनी हायकोर्टात केली आहे. पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएने मात्र विरोध केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना एनआयए कोर्टात जाण्याचे निर्देश दिल्याने हायकोर्टात त्यांनी असा अर्ज करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कर्नल पुरोहित यांच्यावरील मोक्का अंतर्गत असलेले आरोप हटवण्यात आले असून त्यांच्यावर यूएपीएअंतर्गत मात्र आरोप कायम ठेवले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























