मुंबईत ज्येष्ठ नागरिकाचं घरोघरी जाऊन लसीकरण, BMC लवकरच वॉर्डनिहाय लसीकरण कँप सुरु करणार
ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली. त्यावरील सुनावणी दरम्यान ही गोष्ट समोर आली.
मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे महापालिका पुढील आठवड्यापासून वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याच्या विचारात आहे. ज्यातून 70 हजार लोकांचं लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंगळवारी हायकोर्टात पार पडलेल्या एका बैठकीत दिली. लसीकरणासंदर्भातील एका सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गोष्ट जाहीर केली.
मुंबईत प्रभागवार रचनेनुसार एकूण 227 वॉर्ड आहेत. तेव्हा प्रत्येक वॉर्डात एक यानुसार हे कँप सुरू होण्याची शक्यता आहे. ही मोहीम खासकरून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी असेल, कारण लसीकरणासाठी सध्या त्यांची फारच वणवण सुरू आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आलंय. भारतातही केंद्र सरकारनं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करायला हवी होती. जेणेकरून लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका कमी झाला असता. या प्रक्रियेतून अनेकांचा प्राण वाचवता आले असते, असंही हायकोर्ट पुढे म्हटलं.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ हा सर्वसाधारणपणे 75 वर्ष पूर्ण वृद्ध आणि दिव्यांग आणि अंथरुणावर खिळलेल्या ज्येष्ठांना घेता येत नाही. म्हणून त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करत अॅड. धृती कपाडिया आणि अॅड. कुणाल तिवारी यांनी एक जनहित याचिका हायकोर्टात केली आहे. त्यावर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं की परदेशांत तर लसीकरण केंद्र हा प्रकारच अस्तित्त्वात नाहीत. अमेरिकेत 'ड्राईव्ह इन' पद्धतीनं अमेरिकेत 'फायझर' लस ही नागरिकांना त्यांच्याच वाहनात बसून देण्यात येत आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जातेय. मात्र, आपल्याकडे याबाबतीत उलट प्रक्रिया असल्याचा टोला त्यांनी लगावला. सध्या अनेक नोंदणीकृत नागरिकांना लस उपलब्ध न झाल्यानं माघारी परतावं लागतंय. ज्येष्ठ नागरीक पैसे आणि वेळ खर्च करूनही माघारी परतत आहेत, हे योग्य नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं.
मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या मुंबईतील खासगी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, आणि पालिकेने सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांमध्येच नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु आता मुंबईतील खासगी सोसायट्या आणि खाजगी कंपन्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शन सूचना लसीकरणादरम्यान प्रत्येक रुग्णालायांना पाळणे बंधनकारक असणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Nagpur on Coronavirus : राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय
- Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टातून थेट कॉल, पुढे काय झालं?
- राजकीय नेत्याने जाहीर कार्यक्रम करु नये असे आदेश जारी करावे लागतील : मुंबई उच्च न्यायालय
- AMU Coronavirus Death : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, नव्या व्हेरिएंटची चाचपणी करण्याची ICMRला विनंती