Mumbai Potholes : 2 वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार, इकबाल सिंह चहल यांचा विश्वास
Mumbai Potholes : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा आढावा घेतला. त्यावेळी आयुक्त इक्बाल सिंह चहल बोलत होते.
Mumbai Potholes : मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले.
सध्या 236 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. तर 400 किलोमीटरची कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. 2023-24 मध्ये आणखी 423 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेणार आहोत. मुंबईतील नवीन सिमेंट रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर असतील शोषखड्डेही असतील, असे त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या.
यंदा 236.58 किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी दोन हजार 200 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित 423.51 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले. यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.