मोठी बातमी : ठाकरे-शिंदेंच्या लढतीतील सर्वात मोठी फाईट, संतोष धुरींऐवजी सुनील शिंदेंच्या भावाला तिकीट, समाधान सरवणकरांविरुद्ध लढणार
Shivsena UBT Candidate Nishikant Shinde : महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठ्या लढतींपैकी एक असलेल्या वॉर्ड क्रमांक 194 मधून दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असतील.

मुंबई : शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळालेल्या प्रभादेवी-दादर भागातील वॉर्ड क्रमांक 194 मधील लढाई अखेर ठरली आहे. ठाकरे बंधूंमध्ये या वॉर्डसाठी दोघांच्या निष्ठावंत सैनिकांमध्ये चढाओढ सुरु होती. मनसेचे संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि उद्धव ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे (Nishikant Shinde) या वॉर्डसाठी इच्छुक होते. अखेर हा प्रभाग शिवसेनेला सुटला असून, प्रभाग क्रमांक 194 मधून निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असतील. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून याच वॉर्डचं नेतृत्व समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी केलं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे यांच्या संघर्षात या प्रभागात मुंबईतील सर्वात टफ फाईट पाहायला मिळू शकते.
निशिकांत शिंदे हे ठाकरेंचे विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी आपला वरळी हा मतदारसंघ सोडला होता. त्याचं बक्षीस म्हणून सुनील शिंदेंना शिवसेनेने विधानपरिषदेवर पाठवलं. त्यानंतर आता त्यांच्या भावासाठी वॉर्ड क्रमांक 194 हा ठाकरे सेनेने आपल्याकडे ठेवला आहे.
192 आणि 194 प्रभागांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र 192 प्रभाग मनसेला देण्यात आला असून यशवंत किल्लेदार हे मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर 194 प्रभागामध्ये निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असतील.
MNS Santosh Dhuri : संतोष धुरींची नाराजी कशी दूर करणार?
दरम्यान, संतोष धुरी हे मनसेचे पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. मनसेच्या आक्रमक आंदोलनांमध्ये संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह संतोष धुरी यांचं नावही घेतलं जातं. फायरब्रँड कार्यकर्त्यासाठी स्वत: राज ठाकरे हे सुद्धा संतोष धुरी यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा करत होते. मात्र हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्याने संतोष धुरी यांना माघारी घ्यावी लागली. आता त्यांची नाराजी दोन्ही पक्ष कशी दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Uddhav Thackeray Shivsena BMC Candidate : उद्धव ठाकरेंचे उमेदवार रिंगणात
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जवळपास 90 उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत. ठाकरे सेनेने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली नाही, तर थेत एबी फॉर्म वाटपालाच सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे 90 उमेदवारांना AB फॉर्म दिले असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोर पेडणेकर यांचं नाव मात्र या यादीत नाही. त्यांना उमेदवारी अर्जासाठी आज दोनवेळा मातोश्रीवर चकरा माराव्या लागल्या.
MNS Candidate List BMC Election : मनसेचे 15 उमेदवार जाहीर
दरम्यान, मनसेकडून आतापर्यंत 15 उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे,
१) वार्ड १९२ - यशवंत किल्लेदार
२) वार्ड १८३ - पारूबाई कटके
३) वॉर्ड ८४ - रूपाली दळवी
४) वॉर्ड १०६ - सत्यवान दळवी
५) वॉर्ड ६८ - संदेश देसाई
६) वार्ड २१- सोनाली देव मिश्रा
७) वॉर्ड ११ - कविता बागुल माने
८) वॉर्ड १५० - सविता माऊली थोरवे
९) वॉर्ड १५२ - सुधांशू दुनबाळे
१०) वॉर्ड ८१ - शबनम शेख
११) वॉर्ड १३३ - भाग्यश्री अविनाश जाधव
१२) वॉर्ड १२९ - विजया गीते
१३) वॉर्ड १८ - सदिच्छा मोरे
१४) वॉर्ड ११० - हरिनाक्षी मोहन चिराथ
१५) वॉर्ड २७ - आशा विष्णू चांदर
ही बातमी वाचा:























