BMC Election: मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
येत्या 7 मार्चला मुंबई महापालिकेचा कार्यकाल संपणार असून त्यानंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यासाठी मुंबई अधिनियम, 1988 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.
राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, "मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्चला संपणार आहे. पण मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक घेणं शक्य होणार नाही. त्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार असून राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल."
येत्या 7 मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे तर निवडणुका एप्रिलअखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या मधल्या कालावधीसाठी 7 मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
राज्य सरकारने गेल्याच वर्षी मुंबई तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार मुदत संपलेल्या महापालिकेवर प्रशासक नियुक्त केला जाईल. पालिकेतील नगरसेवकांना पाच वर्षांपेक्षा अधिक मुदतवाढ दिली जाणार नाही अशी तरतूद त्यामध्ये केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 साठी बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर आता नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत. या संदर्भातील प्रारुप आराखडा बीएमसीकडून जारी करण्यात आला आहे.
नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. हे सर्वच 9 नवे प्रभाग हे शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात.
महत्त्वाच्या बातम्या: