एक्स्प्लोर
Advertisement
'आवरा रे या महिलांना कोणीतरी', दादरमध्ये क्लीन-अप मार्शलची दहशत
सोमवारीही या महिला मार्शलनी एका कॅन्सर रुग्णाला आणि एक प्रवश्याला अडवलं. त्याने आपण चुकून थुंकलो आहे असं सांगत माफी मागितली. मात्र या मार्शल महिलांनी कोणतीही दयामाया न दाखवता पाचशे रुपये दे असं म्हणत शिवीगाळ सुरू केली.
मुंबई : दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत क्लीन-अप मार्शल नेमण्यात आलेले आहेत. मात्र या महिला मार्शलांमार्फत नागरिकांना अर्वाच्य शिवीगाळ करत दादागिरी करत दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे या स्टेशन परिसरात येणारे नागरिक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. या महिला मार्शल आज अर्वाच्य शिवीगाळ करत असताना काही नागरिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला मार्शलकडून दादागिरी सुरू केल्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आणि गोंधळ सुरू झाला. या महिला मार्शलच्या वतीने नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे.
तुम्ही जर दादर स्टेशनच्या बाहेर आलात तर सुरुवातीला तुमच्या कानी एकच आवाज पडतो, तो म्हणजे एका महिलेच्या ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा. हा आवाज असतो महापालिकेच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत नेमलेल्या महिला क्लीन-अप मार्शलचा. स्टेशन परिसरामध्ये पान, गुटखा खाऊन थुंकलं की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने सी .आय. एस. ब्युरोज फॅसिलिटीज सर्विसेस लिमिटेड या कंत्राटदाराला ठेका दिलं आहे. या कंपनीकडून क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात आलेली आहे.
मात्र एखादा जरा थुंकला की त्याच्या गळपतीला धरुन या महिला मार्शल त्या व्यक्तीला ओढत अर्वाच्च शिवीगाळ करत रस्त्याच्या बाजुला आणतात. त्यांने दंड द्यायला नकार दिला तर त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत वेळ प्रसंगी थोबाडीत ही मारतात. एवढ्यावर हे प्रकरण थांबत नसलं आणि तरीही दंड दिला नाही तर अगोदरपासूनच दबा धरून बसलेले तिच्या अन्य सहकारी तिथे येतात आणि या नागरिकांना बाजूला घेऊन मारहाणही करतात. हे प्रकरण दररोज दादर स्टेशनच्या बाहेर सुरू असतं.
सोमवारीही या महिला मार्शलनी एका कॅन्सर रुग्णाला आणि एक प्रवश्याला अडवलं. त्याने आपण चुकून थुंकलो आहे असं सांगत माफी मागितली. मात्र या मार्शल महिलांनी कोणतीही दयामाया न दाखवता पाचशे रुपये दे असं म्हणत शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ सुरू होताच इतरही नागरिक त्याठिकाणी जमायला लागले आणि या नागरिकांनी त्या मार्शलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिला मार्शल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जाब विचारणाऱ्या नागरिकांनाच कपडे काढून मारेन अशी धमकीही या बाईने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे इथले नागरिक चांगलेच संतापले. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच या महिला मार्शल नी सर्वांनाच धमकावले, तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करतो अशी धमकी द्यायला सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी या मार्शलला पोलीस स्टेशनकडे नेलं आणि तिच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमध्ये जरी तक्रार दाखल झाली असली तरीही या महिला मार्शल यांच्या जोरावर दादागिरी करत आहेत. त्या कंत्राटदाराला ही ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
कल्याणमधील क्लिन अप मार्शल्सची खुलेआम वसुली, पावती न देताच पैसे उकळल्याच्या तक्रारी
ठेका महापालिकेचा दादागिरी मात्र क्लीन-अप मार्शलची
1) बृहन्मुंबई महापालिकेने सी.आय.एस ब्युरोज फॅसिलिटीज सर्विसेस लिमिटेड या खाजगी कंपनीला दादर स्टेशन परिसरातील क्लीन-अप मार्शलचं कंत्राट दिलेले आहे.
2) या ठेकेदारांने क्लीन-अप मार्शल म्हणून महापालिकेचे ओळख पत्र देऊन 6 महिलांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. या मार्शल या परिसरातील नागरिकांना अर्वाच्य शिवीगाळ करत असतात.
3) स्टेशन परिसरात पान तंबाखू गुटखा खाऊन कोणी थुंकलं, तर त्याच्यावर नजर ठेवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे काम या कंत्राटदाराचा आहे. दंड म्हणून शंभर ते दोनशे रुपयांची पावती असा दंड आहे. मात्र या महिला मार्शल पाचशे रुपयांपासून पैसे मागायला सुरुवात करतात.
4) या महिलांपैकी दोन महिला नागरिकांना पकडून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करतात आणि वेळप्रसंगी थोबाडीत मारतात.
5) धमकी देऊन , शिवीगाळ करून ही एखाद्याने दंड द्यायला नकार दिला , तर अगोदरच दबा धरून बसलेले अन्य तीन ते चार सहकारी तिथे येतात आणि त्या नागरिकाला बाजूला घेऊन मारहाणही करतात.
6) हा संपूर्ण प्रकार पोलिसां समोरच घडत असतो. मात्र पोलिसांना या परिसरात काय सुरू आहे हे दिसत नाही.
7) या महिला मार्शल ना या कंत्राटदाराने दिवसाला ठराविक रक्कम दंड लोकांकडून वसूल केलाच पाहिजे असं टारगेट दिलेलं असतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या महिला नागरिकांची पिळवणूक करत असतात.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
- ‘या महिलेचा एका रुग्णाला सोबत वाद सुरु होता. ही महिला शिवीगाळ करत असल्यामुळे मी त्या ठिकाणाहून जातांना थांबलो. आणि नेमका काय प्रकार आहे तो पाहू लागलो. बाईसाहेब ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने मलाच तुझे कपडे काढून मारेन अशी धमकी द्यायला सुरुवात केली. या महिला दररोज अशा पद्धतीने नागरिकांना त्रास देत असल्याचे पूर्वीसुद्धा मी पाहिलेला आहे. त्यामुळे या महिलांवर ताबडतोब कारवाई करावी’, अशी मागणी धनंजय डोईफोडे या सामान्य नागरिकांने केली आहे.
- ‘क्लीन-अप मार्शल मधील या महिलांच्या दादागिरीला आम्ही कंटाळलो आहोत. दंड वसुलीच्या नावाखाली या महिला गरीब लोकांना मारहाण करतात. दंड वसूल करण्याचा अधिकार त्यांना महापालिकेने दिला असेल, पण नागरिकांना मारण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. हा सगळा प्रकार पोलिसांसमोर घडत असतो, मात्र पोलीस त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याची खंत’, शशिकांत पारेकरांनी व्यक्त केली आहे.
- ‘याआधी देखील या मार्शल महिलांच्या विरोधात तक्रार दिलेल्या आहेत. मात्र महानगरपालिकेचे इथले स्थानिक अधिकारी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे त्या बेभान होऊन खुलेआम दादागिरी करत लोकांना मारहाण करत आहेत. तिथल्या स्थानिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने या ठेकेदाराचा ठेका काढून घेतला पाहिजे’, अशी मागणी विजय कदम यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement