अमित शाह मुंबई दौरा आटोपून दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना उधाण
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक केली.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह विलेपार्ले येथील बैठक आटोपून दिल्लीला पुन्हा रवाना झाले आहेत. बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र अमित शाह मुंबई दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अमित शाह संध्याकाळी पाच वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अमित शाह यांचं विमानतळावर स्वागत केलं. बैठक संपवून अमित शाह रात्री आठ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
अमित शहा यांनी शिर्डी येथील 10 वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाबाबत आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ याठिकाणी करणार आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण देशाच्या विविध भागात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ या संघाच्या कार्यालयात बैठक केली.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या चर्चा झाल्याची राजकीय अंदाज बांधले जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र हा मुहूर्त टळून गेला तरीही अद्याप मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत हालचाली दिसत नाहीत.
राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात शिवसेनेला सोबत ठेवणंही भाजपसमोर आव्हान असेल.
सध्या भाजप शिवसेनेमधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.