मुंबईत अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहताना गृह खातं झोपलंय का? भाजपचा सवाल
राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री सुडाचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबई : मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत छापा टाकून एमडी ड्रग्सचा कारखाना उध्वस्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले. परंतु मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना महाराष्ट्राचे गृह खाते आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
भातखळकर म्हणाले की, एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती. काल एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 12 किलो एमडी नामक ड्रग्स, 2 कोटी 28 लाख रुपये रोख, 2 रिव्हॉल्व्हर व काही जिवंत काडतुसे मिळाली, धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना मागील वर्षभरापासून तिथे चालू होता हे सुद्धा उघडकीस आले आहे, असं भातखळकरांनी म्हटलंय.
भातखळकरांनी म्हटलं आहे की, केंद्रीय पथकाकडून मागील 6 महिन्यात 20 पेक्षा अधिक ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अंमली पदार्थ उध्वस्त करण्यात आले, यात अनेक मोठ्या व प्रसिध्द व्यक्तींचा सहभाग असल्याचे सुद्धा उघडकीस आले आहे. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना ते सुद्धा केवळ राजकीय वक्तव्य करण्यात मशगुल आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्स ची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असा खोचक सल्ला सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.