Raj Thackeray : शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठींबा; भाजप नेते म्हणतात, अब की बार 400 पार!
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठींबा राज ठाकरेंना जाहीर केला. यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
MNS Gudi Padwa Melava : शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा (MNS Gudi Padwa Melava 2024) मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) बिनशर्त पाठींबा त्यांनी जाहीर केला. राज ठाकरेंच्या निर्णयाचे महायुतीच्या नेत्यांनी स्वागत केले असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संकल्पबद्ध होऊ या - देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, राज ठाकरेंच्या पाठिंब्याचे मी स्वागत करतो. दोन भावांच्या स्वभावाचे व्यक्तिमत्वाचे दर्शन आजच्या या निर्णयाने होत आहे. एक भाऊ भारतीय जनता पक्षासोबत महायुती सोबत आले होते. आम्ही जिंकलो तेव्हा त्यांनी खुर्चीसाठी धोका दिला, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नाव न घेता लगावला. तर दुसरे भाऊ जे त्याच कुटुंबातील आहेत. त्यांनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला. देशभक्तीचा भाव लोकांपर्यंत पोहोचवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मनसेचा महायुतीला पाठींबा उपयोगी ठरणार : विनोद तावडे
भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) म्हणाले की, राज ठाकरे हे पहिले होते की ज्यांनी मोदी साहेबांचे काम गुजरातमध्ये जाऊन पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे कौतुकदेखील केले होते. राज ठाकरेंना एखादी गोष्ट पटली की ते उघडपणे कौतुक करतात आणि जर गोष्ट पटली नाही तर ते विरोधही करतात. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पहिले तर मनसेचा महायुतीला पाठींबा हा अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे महाराष्ट्रातील जनतेचे स्वागत केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा