Pravin Darekar: देवेंद्र फडणवीस माझे गुरु; मनोज जरांगेंच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं आक्रमक प्रत्युत्तर
Maharashtra Politics: प्रवीण दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू; मनोज जरांगे कडाडले. मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि दरेकर आमनेसामने. प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध पेटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेत्यांवर मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आगपाखड करताना दिसत आहेत. जरांगे यांनी रविवारी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गटातील नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर हल्ला चढवला. मनोज जरांगे यांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरु असल्याचा उल्लेख केला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रवीण दरेकर यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. पवारांना त्यांनी आरक्षणाबाबत विचारावं. ते ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मराठा आरक्षणाबाबत काही विचारत नाहीत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास येत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याच प्लॅनिंग करताय. राजकीय भूमिका घ्यायची असल्यास मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे. जरांगे यांनी राजकीय अजेंडा न राबवता मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
मनोज जरांगेंची प्रवीण दरेकरांवर टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. त्यावरुन मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकर यांना लक्ष्य केले. मराठा समाज सगळं उघड्या डोळ्याने बघतो आहे. दरेकर तू पदाचं आमिष दाखवून लोकांना फोडायला लागलाय. माझ्याविरोधात तुमचं अभियान पुन्हा सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. दरेकर आणि आणखी दोन-चार लोकांनी माझ्या बदनामीसाठी मोहीम सुरु केली आहे. मराठा समाजातील अभ्यासक आणि समन्वयक फोडायचे आणि त्यांना माझ्याविरोधात बोलायला लावायचे, पत्रकार परिषदा घ्यायला सांगितले जात आहे. दरेकर हे ही सगळी सुत्रे हलवत आहेत. पण प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमिषापोटी जाणाऱ्या मराठा समाजातील लोकांनी लक्षात ठेवावे की, उद्या तुम्हाला समाजाला सामोरे जायचे आहे. दरेकर हा वाटोळं करणारा माणूस आहे. तो देवेंद्र फडणवीस बस सांगतील तिथे बसतो, रात्रभर उभा राहा सांगितलं तर उभा राहतो, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
या सगळ्या घडामोडी पाहता तरी भाजपमधील मराठा नेत्यांना डोळे उघडावे लागणार आहेत. फडणवीस आपल्याविरोधात चाली रचत आहेत, आता आपल्यालाही फडणवीसांविरोधात चाली रचाव्या लागणार आहेत. एखाद्या वेळेस शिंदे पवारांचे आमदार मराठे निवडून देतील आणि तुझेच पाडतील दरेकर,आणि बघ निवडक भाजपचे आमदार आम्ही मराठे पाडतो का नाही बघ, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
आणखी वाचा