(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात
BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : नवाब मलिक यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी, सोमय्या यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होत असल्याचं विशेष कोर्टानं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच कोर्टानं केलेल्या टिपण्णीनंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मलिकांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी असल्याचा हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे दिसतं अशी टिपण्णी कोर्टानं केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.
मलिकांचे सर्व आर्थिक व्यवहार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना माहिती होते : सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून सगळं मंत्रिमंडळ नवाब मलिकांसाठी मैदानात आलं होतं. आता न्यायालय सांगतंय की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. आता उद्धव ठाकरे साहेब, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की, न्यायालय देखील पाकिस्तानचं आहे, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार." पुढे बोलताना, "खरंतर ही चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सगळे आर्थिक व्यवहार माहिती होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तर बिल्डर आहे. बिल्डर लोकांना सगळं कळतं. मातोश्रीपासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळं माहिती होतं. उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. हे नवाब मलिक काही लाखांत 100 कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे उत्तर द्या.", असं किरीट सोमय्या म्हणाले.
तुमचे आणि दाऊदचे काय संबंध? उद्धव ठाकरे उत्तर द्या : किरीट सोमय्या
"मला तर शंका आहे की, उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्णाण झाले आहे. आता नवाब मलिकांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावं लागेल की, तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत. काय बोलणं झालं आहे?", उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्यांनी खोचक सवाल केला आहे.
उद्धव ठाकरेंना धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची? : किरीट सोमय्या
"संजय राऊत रोज मनोरंजन करतात. रोज काही ना काही बोलतात. आता राज्यातील जनता हसायला लागली आहे. मूळ मुद्दा त्यांना डायव्हर्ट करायचा आहे. त्यांना कल्पना होतीच की नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध बाहेर येणार. म्हणून हे थोतांड उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांद्वारे लक्ष वळवण्यासाठी हे केलं. एवढं सिद्ध होऊनही त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जात नाही. उद्धव ठाकरेंना धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची?" , असं सोमय्या बोलताना म्हणाले.