(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातील खड्ड्यांप्रश्नी अधिकाऱ्यांवरील कारवाईनंतर भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल; पालकमंत्री एकनाथ शिंदे हतबल असल्याची टीका
रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अधिकार्यांवर ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी निधी द्यावा अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
कल्याण : ठाणे शहरातील खड्ड्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड करत जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित केलं. या कारवाई नंतर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून भाजपने पालकमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्र्याची निधी आणण्याची मानसिकता नाही, पालकमंत्री हतबल आहेत. जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबन करण्याऐवजी शासनाने यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा असा घणाघात रवींद्र चव्हाण यांनी केला. तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ज्याप्रमाणे ठाणे महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवलीत देखील कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली. एकूणच ठाण्यातील कारवाईनंतर आता शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने उभे ठाकले आहेत.
नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहररातील रस्त्याची पाहणी करत खड्ड्याबाबत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण व कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय. आमदार रवींद्र चव्हाण यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यात पडून काही दुचाकीस्वारांनी जीव गमावल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने एमएमआर रिजनमधील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यातून शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटचे झाले. मात्र आता विद्यमान पालकमंत्री राज्य शासन, एमएमआरडीए कडून सोयी सुविधांसाठी निधी आणण्यास हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी अधिकार्यांवर ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने रस्ते कॉंक्रिटीकरण यासाठी निधी द्यावा अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
ठाणे मनपाने केले चार अधिकारी निलंबित, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ठरवले दोषी
तत्कालीन भाजप सरकारने मंजूर केलेला रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याची पालकमंत्र्यांची मानसिकताच नाही म्हणूनच हतबलतेतून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याचा सनसनाटी आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. तर आमदार गणपत गायकवाड यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून कल्याण शिळफाटा रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. यामुळे या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करत यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, महापालिकेच्या मलनिस:रण वाहिन्यांच्या कामात, सिग्नल यंत्रनेच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाणे प्रमाणे कल्याण डोंबिवली शहरातील दोषी अधिकाऱ्यावर देखील कारवाई करा अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केली.