(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BIS : भेसळयुक्त पाणी विकणाऱ्या माहुल परिसरातील कंपनीवर BIS ची कारवाई
Bureau of Indian Standards : ब्युरो आफ इंडियन स्टॅण्डर्डनं मुंबईच्या माहुल परिसरात वॉटर प्लांटच्या विरोधात कारवाई केली आहे.
मुंबई: सणासुदीच्या अगोदर ब्युरो आफ इंडियन स्टॅण्डर्डने ( BIS) मुंबईच्या माहुल परिसरातील एका वॉटर प्लांटच्या (Water Plant) विरोधात कारवाई केली आहे. बिसलेरी कंपनीची फ्रेंचाईजी असलेल्या प्रतिमा फूड एन्ड बेव्हरेजेस कंपनीच्या प्लांटवर ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीवर कमी दर्जाचं बाटलीबंद पिण्याचं पाणी विकण्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र कंपनीकडून याबाबत अजून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मुंबईच्या माहुल परिसरातील प्रतिमा फूड एन्ड बेव्हरेजेस ही वॉटर प्लांट कंपनी नामांकित बिसलेरी कंपनीची फ्रेंचाइजी आहे. या कंपनीच्या प्लांटवर बीआयएस (Bureau of Indian Standards) अधिकाऱ्यांनी बुधवारी कारवाई केली आहे. फ्रेंचाईजी कंपनीवर कमी दर्जाच्या पॅकेज्ड पिण्याचा पाणी विकण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या कंपनीवर मागील महिन्यात काही प्रतिबंध लावण्यात आले होते. तरीही या कंपनीत वॉटर मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग सुरू होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या कार्यपद्धतीसंबंधित तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर ही कंपनी BIS च्या रडारवर असल्याचं समोर आलं आहे. या प्लांटमधून पिण्याच्या पाण्याचे काही सॅंपल BIS च्या अधिकाऱ्यांनी घेतले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर BIS ने या प्लांटने काम स्थगित करावं असा आदेश दिला होता. पण तरीही रात्रीच्या वेळी या कंपनीत काम सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर BIS च्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी या कंपनीवर धाड टाकत कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रतिमा फूड एन्ड बेव्हरेजेस आणि बिस्लेरी कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.
प्रतिमा फूड एन्ड बेव्हरेजेस या वॉटर प्लांटवरील कारवाईनंतर या कंपनीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. BIS आणि FSSAI कडून या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात मुंबईत अन्नामध्ये भेसळ करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची तक्रारी येत आहेत. खासकरून दूध आणि मिठाईंमध्ये ही भेसळ होत असताना दिसत आहेत. आता ही भेसळ रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्येही होत असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाची बातमी :
- Karnataka Bhavan : सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना महाराष्ट्रात 'कर्नाटक' नाव कशासाठी? कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध