
Bhushan Gagrani | मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद सौरभ राव (Saurabh Rao) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यासह कैलाश शिंदे (Kailash Shinde) यांच्यावर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबबादारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर प्रशासकीय बदल
निवडणूक आयोगानं महाराष्ट्र सरकारला ज्या अधिकाऱ्यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम केलं असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारनं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. महाराष्ट्रासह देशभरात जवळपास अशीच स्थिती होती. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं बदल्यांच्या मुद्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यांना निवडणूक आयोगानं पदावरुन हटवलं होतं. निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र सरकारनं इकबाल चहल, आश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. अखेर आयोगानंच बदल्या केल्या होत्या.
अभिजित बांगर, राजेश नार्वेकर यांना नवी जबाबदारी
याआधी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नवी मुंबईचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राजेश नार्वेकर यांच्याकडे सहकार आणि निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.
भूषण गगराणी कोण आहेत? (Who is Bhushan Gagrani)
इक्बाल चहल यांची बदली झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. डॉ. संजय मुखर्जी तसेच अनिल डिग्गीकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र शेवटी गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1990 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
