BEST Strike : आणखी किती दिवस मुंबईकरांचे हाल होणार? सहाव्या दिवशीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच
BEST Strike : मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग सहाव्या दिवशीही संप सुरुच आहे. त्यामुळे या संपाबाबात तोडगा कधी निघणार हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
BEST Strike : मुंबईला (Mumbai) ज्याप्रकारे मुंबई लोकल (Mumbai Local) तारते त्याप्रकारे येथे बेस्ट (BEST) बस देखील उत्तम सेवा देत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र गेल्या सहा दिवसांपासून बेस्ट बसचा काहीसा मूड बिघडलेला आहे. मुंबईकरांवर ही बेस्ट बस नाराज झाली असल्याचं म्हटलं जात आहे. बेस्ट बस (BEST Employee) कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. पण कामगारांच्या या आंदोलनामुळे मुंबईकर मात्र हैराण झाले आहेत. पण यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला अजून यश आलं नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा संप किती दिवस चालणार आणि मुंबईकरांचे आणखी किती दिवस हाल होणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
मुंबईकरांचे प्रचंड हाल
दररोज 35 लाख लोक बेस्ट बस ने प्रवास करत असतात. बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कोणत्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. गेली अनेक वर्ष भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". मात्र मागील काही वर्षांत झालेल्या तोट्यामुळे या व्यवस्थेचं संपूर्ण चित्रच पालटलं असल्याचं म्हटलं जात आहे.
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत. विविध मार्गांवर चालविण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील बसेसवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे.
कंत्राटदारांचे कर्मचाऱ्यांना पत्र
बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने कंत्राटदारांचे नाव खराब होत असल्याचा दावा कंपन्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचा इशारा कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी हे कर्मचारी संप मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांनी का पुकारला संप?
मुंबईची राणी असलेल्या बेस्ट बसचं प्रशासन सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलं आहे.त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस घेण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी प्रशासनाकडून निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. तर या बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात आली होती. पण आता मुंबईतील पंचवीस आगारांपैकी 19 आगारांमधील 9000 कर्मचारी कर्मचाऱ्यांनी अचानक बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरु असून यावर तातडीने तोडगा निघणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे.
नेमक्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
या कर्मचाऱ्यांना दरमाहा देण्यात येणारं 16 हजार वेतन हे 25 हजार रुपयांपर्यंत मागणी हे कर्मचारी करत आहेत. तसेच बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्याची सेवा देण्यात यावी. ज्या बसमध्ये बिघाड आहे त्या बस दुरुस्त करुनच आगाराबाहेर काढाव्यात. बंद बसमार्ग पुन्हा सुरू करावेत. तसेच बेस्ट हे महापालिकेमध्ये विलीन करावे अशा मागण्या हे कर्मचारी करत आहेत.
बेस्ट प्रशासनाचं म्हणणं काय?
सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहील, असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. संबंधित कंपन्या,बेस्ट प्रशासन आणि सरकारकडून या संदर्भात कोणत्याही चर्चेसाठी बोलावणं आलं नसल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तर या कर्मचाऱ्यांचा आणि प्रशासनाचा काही संबंध नसल्याचं बेस्ट प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण तरही कंत्राटदारांसोबतच बोलणं सुरु असून हा संप मिटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं देखील बेस्ट प्रशासानाकडून सांगण्यात येत आहे.
तसेच अतिरिक्त 700 गाड्या रस्त्यावर आणल्या आहेत, तर एसटीच्या अतिरिक्त 150 गाड्या मागवण्यात आल्या असून जर आणखी गरज लागल्यास ही संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. कंत्राटदारांवर नियम आणि अटीशर्तींप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बेस्ट प्रशासन सध्या मेस्मा लावण्याच्या विचारात आहेत पण तो कंत्राटदारांवर लावयचा की कर्मचाऱ्यांवर यावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केललेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यास सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या काही गाडी देखील यामध्ये सामील करण्यात आलेल्या आहेत. पण तरीही अपुऱ्या सोयीमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.