Bakri Eid 2022 : बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज, चोरी टाळण्यासाठी बकऱ्यांना लागणार बारकोड
Bakri Eid : बकरी ईदनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध अशा देवनारच्या पशुवधगृह येथे बकरा बाजार उभारला जातो. याठिकाणी पाच हजारांपासून ते लाखोरुपयांपर्यंतचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध होतात.
Deonaar Bakri Eid : यंदा बकरी ईद (Bakri Eid) हा सण रविवारी (10 जुलै) देशभरात साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध अशा देवनारच्या पशुवधगृह (Deonar Bakra Mandi) येथे बकरा बाजार उभारला जातो. विविध राज्यातून लाखो बकरी या बाजारात विक्रीसाठी आणण्यात येतात. अगदी पाच हजारांपासून ते लाखो रुपये किंमतीपर्यंतची बकरी याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव बकरी खरेदी करण्यासाठी येत असल्याने याच गर्दीचा फायदा उचलत काहीजण बकरी चोरी करण्याचा प्रयत्न देखील करतात. दरम्यान बकऱ्या चोरीचे प्रकार यावेळी घडू नये याकरता मुंबई महानगर पालिका आणि देवनार पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.
काळजी घेण्यासाठी बाजारात दाखल होणाऱ्या तसेच विकल्या जाणाऱ्या शिवाय शिल्लक असलेल्या अशाप्रकारे सर्वच बकऱ्यांची बारकोडच्या सहाय्याने नोंदणी केली जात आहे. बारकोड सिस्टमचा वापर केला जात असला तरी अन्य खबरदारी देखील पोलीस घेत आहेत. यावेळी प्रत्येक गेटवर सिव्हिल कपड्यांमध्ये पोलिस उभे असून खबऱ्यांचे जाळे देखील पसरवले आहे. याव्यतिरिक्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील बाजारातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
परराज्यातील व्यापाऱ्यांची विशेष काळजी
परराज्यातून बकऱ्या विकायला आलेल्या व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची देखील काळजी घेतली यावेळी घेतली जात आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याचा फोटो स्कॅन करून आणि त्याला बारकोड देऊनच आत प्रवेश दिला जात आहे. शिवाय बकऱ्या विकत घेणाऱ्यास गेटवर खरेदी पावती आणि बारकोड दाखवूनच बकऱ्यांना गेट बाहेर सोडले जात आहे.
तब्बल सात लाखांचा बोकड
शराफतअली गोरी हा व्यापारी गुजरात राज्यातून मुंबईच्या देवनार बाजारात जे बोकड विक्रीसाठी घेऊन आला आहे, त्याची किंमत तब्बल 7 लाख रुपये लावण्यात आली आहे. शराफत यांच्या म्हणण्यानुसार या बकऱ्याच्या शरीरावर उर्दूमध्ये अल्लाह शब्द आहेत. हे शब्द जन्मापासून त्याच्या शरीरावर असल्यानेच त्याची किंमत तब्बल 7 लाख रुपये किंमत लावली गेली आहे.
हे ही वाचा -