Baba Siddique : गोळीबारावेळी आरोपींच्या हाती बंदूक, तरीही API राजेंद्र दाभाडे डगमगले नाहीत; बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना जीवाची बाजी लावून पकडलं
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांच्यावर वांद्रेतील खेरवाडी परिसरात गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एक आरोपी अद्याप फरार आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने पकडले. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय असून त्यांनी जीवाची बाजी लावून दोन्ही आरोपींना पकडलं आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. बाबा सिद्दिकींवर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीच्या हातात बंदूक असतानादेखील धाडस दाखवलं आणि दोन आरोपीना पकडले. यातील एक आरोपी हा गर्दी आणि फटाक्यांच्या धुराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.
सध्या बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणांमध्ये मुंबई गुन्हे शाखेची टीम अधिक तपास करत आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम तयार करण्यात आल्या आहेत.
बाबा सिद्दिकींची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगनं केली का याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, त्यांना नेहमीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेत तीन पोलिस कॉन्स्टेबल तैनात होते असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय.
हत्येचा कट हरियाणातील जेलमध्ये शिजला
सिद्दिकींच्या हत्येचा कट हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये शिजल्याचं समोर आलं आहे. इथेच तीनही आरोपींची भेट झाल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. फरार आरोपी शिवासह हे तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. या वेळी जुहू बीचवर गेलेल्या या तिन्ही आरोपींनी आठवण म्हणून फोटो काढला होता..यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं.
यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 28 जिवंत काडतूसं, दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता. तर दुसरा नियमीत वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
फरार आरोपी पनवेलमध्ये दिसला
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला फरार आरोपी शिवानंद हा पनवेलमधून बाहेरच्या राज्यात पळून गेल्याचं समोर आलं आहे. शिवानंद हा पनवेल स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. आरोपी शिवानंदच्या शोधासाठी पोलिसांची पथकं मध्य प्रदेशातील उज्जैन, हरियाणा, यूपी आणि दिल्लीकडे रवाना झाली आहेत.
ही बातमी वाचा: