(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra VidhanSabha : औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरून अबू आझमी आक्रमक, भास्कर जाधवांकडून जोरदार प्रत्युत्तर
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडीसाठी अभिनंदन केले, पण अभिनंदन नामांतराच्या मुद्यावरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Maharashtra VidhanSabha : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली.
समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. नार्वेकर विजयी झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात त्यांचे सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे कौतुक करताना रेशिम चिमटेही काढले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनीही राहुल नार्वेकर यांच्या निवडीसाठी अभिनंदन केले, पण अभिनंदन नामांतराच्या मुद्यावरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
अबू आझमी म्हणाले, की बहुमतापेक्षा घटनेवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही अल्पमतात आहोत, बहुमताने निर्णय घेत असाल, तर आम्ही कुठे जावे? आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. मात्र, शहरांची नावे बदलून विकास होतो का? बेरोजगारांना रोजगार, विकास होत असेल, तर आमचा आमचा विरोध नाही. नाव बदलून काय संदेश देणार आहात ? मुस्लिमांची नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा केली.
जुन्या शहरांची नावे बदलून काय करणार, नवीन शहर वसवा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शहर वसवा, टाळ्या वाजवून स्वागत करू, असे अबू आझमी म्हणाले. अबू आझमी यांनी नामांतराला विरोध केल्यानंतर शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही, भास्कर जाधवांचा आक्षेप
भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्यावर आक्षेप घेतला आणि मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Rahul Narvekar : विधिमंडळात सासरे-जावई यांची जोडी, विधान परिषदेत सासरे तर विधानसभेत जावई
- Anil Gote : ..म्हणून वडिलकीचा सल्ला देतो, मानला तर आपलाच फायदा! मुख्यमंत्री शिंदेंना माजी आमदारांचे पत्र
- Maharashtra Politics Timeline : सत्तानाट्याचा आज तेरावा दिवस, 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Assembly session : शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा, दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी