Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Asha Sevika Andolan : मुंबई महापालिकेच्या आशा सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.

Asha Sevika Andolan : मुंबई महापालिकेच्या आशा सेविका (Asha Sevika) आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर उतरणार आहेत. सोमवार दि. 16 जूनपासून आशा सेविकांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मागील वर्षी तब्बल 45 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर शिंदे सरकारने (Shinde Government) त्यांची मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या आंदोलनावेळी महापालिकेतील आशा सेविकांना दरमहा पाच हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेची अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार
तसेच, महापालिकेतील आशा सेविकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मागील महिन्याचे वेतन अदा करण्यात येईल आणि उर्वरित मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. 29 जुलै 2024 रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळेच आशा सेविकांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सोमवार दि. 16 जूनपासून आशा सेविकांकडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या कोणत्या?
- 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे,
- महापालिका आशासेविकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान वेतन देणे,
- आशा सेविकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे,
- सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांच्या रिक्त जागेवर महापालिकेच्या आशासेविकांना आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करणे,
- ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र,
- स्टेशनरी अप्रॉन देणे,
- कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























