(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रुग्णवाहिका न दिल्याने गर्भवती महिलेचा कळवा ते कल्याण रेल्वे रुळावरुन पायी प्रवास
आठ महिन्यांची गर्भवती महिला हातात आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन कळव्याहून कल्याणला चालत पाच तासात रेल्वे रुळातून पायी चालत तिने कल्याण गाठलं.
मुंबई : हॉस्पिटलने रुग्णवाहिका न दिल्याने आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेनं कळवा ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळावरुन पायी प्रवास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या महिलेची केडीएमसीनं खासगी रुग्णालयात प्रसूती केली आहे.
सबा शेख असं या महिलेचं नाव असून ती कल्याणच्या कचोरे परिसरात राहते. सबा ही मे महिन्याच्या सुरुवातीला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. मात्र तिथून तिला रुग्णवाहिकेने कळवा इथल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे गेल्यानंतर तिला बाळाचं वजन कमी असून पूर्ण दिवस भरले नसल्याचं सांगत परत जाण्यास सांगण्यात आलं. मात्र परत कल्याणला जाण्यासाठी कुठलीही वाहनाची व्यवस्था नसल्यानं या महिलेनं रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णवाहिका नसल्याचं तिला सांगण्यात आलं. त्यामुळं ही आठ महिन्यांची गर्भवती महिला हातात आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन कळव्याहून कल्याणला चालत यायला निघाली. पाच तास रेल्वे रुळातून पायी चालत तिने कल्याण गाठलं.
या प्रकाराची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना देताच त्यांनी तात्काळ या महिलेला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिथे तिची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. मात्र या सगळ्या प्रकारामुळे या महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ठाणे महापालिका, आरोग्य विभाग आणि कळवा रुग्णालयाच्या या बेजबाबदार वर्तनामुळे या महिलेला किंवा तिच्या बाळाला काही धोका निर्माण झाला असता, तर त्याची जबाबदारी ठाणे महापालिकेनं घेतली असती का? असा संतप्त सवाल सध्या विचारला जात आहे. कालच मुंब्र्यात एका गर्भवती महिलेचा हॉस्पिटल्सनी दाखल करून न घेतल्यानं रिक्षेतच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता या घटनेमुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :