अर्णब गोस्वामी यांना आज हायकोर्टाकडूनही दिलासा नाही, उद्या दुपारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम सलग दुस-या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डात असणार आहे.
मुंबई : अर्णब गोस्वामींना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य सरकारनं यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे युक्तिवाद ऐकण्यास असमर्थ असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम सलग दुस-या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डात असणार आहे.
अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर 7 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीनं अलिबाग दंडाधिकारी कोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी साल 2018 मध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अलिबाग दंडाधिकारी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी आधीच आपला 'ए' समरी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपीच्या कस्टडीची गरज नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
बुधवारी रात्री बराच उशिर झाल्यानं अर्णबसह या प्रकरणातील तीन आरोपींच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र रायगड पोलिसांनी यावर उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला. तसेच पोलीस कोठडी नाकारण्याच्या दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाला अलिबाग सत्र न्यायालयात आव्हान देण्याचीही तयारी करून ठेवली. जेणेकरून कायदेशीर बाबींत उपलब्ध असलेला कुठलाही पर्याय शिल्लक राहू नये.
काय आहे प्रकरण? रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :