'अनिल देशमुखांवर कारवाई करताना ईडीनं आपल्याला या प्रकरणात गोवलं', संजीव पालांडेंची हायकोर्टात याचिका
मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणी अटक झालेले अनिल देशमुख (Anil DeshMukh) यांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjiv palande) यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने ईडीला दिले आहेत.
मुंबई : मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात अटक झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HIgh court) ईडीला दिले आहेत. पालांडे हे 26 जूनपासून याप्रकरणी अटकेत असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने केलेली कारवाई मनीलॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींना छेद देणारी आहे, असा आरोप पालांडे यांनी या याचिकेतून केला आहे.
आपल्या विरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा हा राजकीय हेतूनं दाखल केला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलेल्या निराधार आरोपांवरुन हा गुन्हा दाखल केलेला आहे. केवळ अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आणि राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी बोगस पुरावे करुन आपल्याला अटक केली आहे, त्यामुळे हा गुन्हा रद्दबातल करावा अशी मागणी या याचिकेतून केलेली आहे. आपण साल 1998 पासून सरकारी सेवेत कार्यरत आहोत. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीचे अधिकारी आहोत. आपल्या विरोधात तपासयंत्रणेकडे काहीही पुरावे नाहीत, असा दावाही पालांडे यांनी या याचिकेतून केला आहे.
शुक्रवारी न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. ईडिच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी याचिकेवर बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची मागणी कोर्टाकडे केली. यावर हायकोर्टानं त्यांना चार आठवड्यांचा अवधी देत 28 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
पालांडेंवर काय आहेत आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश देत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपींची गंभीर दखल घेत सीबीआयनं देशमुखांविरोधात 21 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. त्यांनतर ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली. ईडीच्यावतीनं पालांडे आणि शिंदेविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. ईडीच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पालांडे आणि शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. देशमुख यांच्या आदेशावरूनच सचिन वाझेनं मुंबईतील बार मालकांकडून 4.70 कोटी रुपयांची खंडणी गोळा केली. ही खंडणी वाझेनं संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आणून दिली. पालांडे व शिंदे यांनी हा खंडणीचा पैसा दिल्लीतील चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला पद्धतीनं अनिल देशमुखांच्या नागपुरातील श्री साई शिक्षण संस्था या शैक्षणिक व चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवला. यामुळेच यांत पैशांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे.