अनिल देशमुखांविरोधातील ईडीचं मनी लाँड्रिंग प्रकरण, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश देत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपींची दखल घेत सीबीआयनं देशमुखांविरोधात 21 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश देत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपींची गंभीर दखल घेत सीबीआयनं देशमुखांविरोधात 21 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. त्यांनतर ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली. सोमवारी ईडीच्यावतीनं पलांडे आणि शिंदेविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यातच मंगळवारी पलांडे आणि शिंदे यांच्या जामीन अर्जावरही सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, ईडीकडून दाखल ककण्यात आलेल्या दोषारोपपत्राची प्रत अद्याप आरोपींना देण्यात आली नसल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. त्याची दखल घेत मुंबई सत्र न्यायालयानं दोघांच्याही कोठडीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. या सुनावणीदरम्यान आपल्या कुटुंबियांना भेटण्याची विनंती आरोपींकडून करण्यात आली. त्यास मान्यता देत न्यायालयानं आरोपींना कुटुंबियांस न्यायालयातच भेटण्याची परवानगी दिली.
सोमवारी ईडीच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पलांडे आणि शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. देशमुख यांच्या आदेशावरूनच सचिन वाझेनं मुंबईतील बार मालकांकडून 4.70 कोटी रुपयांची खंडणी गोळा केली. ही खंडणी वाझेनं संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आणून दिली. पलांडे व शिंदे यांनी हा खंडणीचा पैसा दिल्लीतील चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला पद्धतीनं अनिल देशमुखांच्या नागपुरातील श्री साई शिक्षण संस्था या शैक्षणिक व चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवला. यामुळेच यांत पैशांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे.