(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ, देशमुख म्हणाले, ईडी कोठडीत छळ सुरु!
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil DeshMukh) यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil DeshMukh) यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. ईडीनं पुढील चौकशीसाठी देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली होती. ईडी कस्टडीला विरोध करत अनिल देशमुखांच्यावतीनं युक्तिवाद देखील केला गेला. मात्र ईडीनं आणखीन 3 दिवसांची कस्टडी वाढवून मागितली. आम्हाला देशमुखांची कस्टडी चौकशीसाठी नकोय, केवळ त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे, अशी ईडीनं कोर्टाला माहिती दिली.
जर सचिन वाझेचं स्टेटमेंट दुसऱ्या कोठडीत असताना घेता येतं मग देशमुखांचं का नाही घेता येत? असं म्हणत अनिल देशमुखांच्या वकिलांनी ईडी कस्टडीला विरोध केला. ईडीनं हेतूत: आपल्याला यात गोवून अटक केली आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना का नाही अद्याप अटक केली? मी चौकशीसाठी हजर झालो आणि मला अटक झाली, असं अनिल देशमुखांच्यावतीनं ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला.
दिवसाला 8-9 तास चौकशी करून त्यांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जातोय, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्या वकिलांनी केला.
सुनावणीच्या सुरुवातीला अनिल देशमुखांनी कोर्टाला एक पत्र दिलं. हे पत्र देशमुखांनी हातानं लिहिलं आहे. देशमुखांनी म्हटलं आहे की, मला ईडी रिमांडमध्ये 10 दिवस झाले. 200 हून अधिक प्रश्न मला विचारून झाले. आता माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे आता पुन्हा ईडी कोठडी वाढवून देऊ नका, अशी विनंती देशमुखांनी कोर्टाकडे केली. या सुनावणीवेळी खासदार सुप्रिया सुळे मुंबई सत्र न्यायालयात हजर होत्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश अनिल देशमुखांनी दिला होता आणि याची जबाबदारी त्यांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्याची दखल घेऊन सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर 13 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती.